मुंबई-गोवा महामार्ग 18 तासांपासून ठप्प

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरीतील लांज्याजवळ मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनरी पुलावरून एक एलपीजी टँकर उलटून नदीत पडल्याने मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमुळे या महामार्गावरील वाहतूक तब्बल 18 तासांपासून ठप्प झाली आहे. टँकर हा एलपीजीने भरलेला असल्यामुळे तो नदीतून बाहेर काढल्याशिवाय वाहतूक सुरू केली जाणार नाही. मात्र त्यामुळे कोकणात जाणार्‍या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला असून तो मार्ग अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

भारत पेट्रोलियमम कंपनीचा हा टँकर असून हा गुरुवारी (दि.22) दुपारी अडीचच्या सुमारास अंजनारी पुलावरून काजळी नदीपात्रात कोसळला आहे. या टँकरचा चालक या अपघातात मृत्युमुखी पडला. या टँकरमध्ये जवळपास 24 ते 25 किलो एलपीजी गॅस असून तो लीक होत असल्याने खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

या टँकरमधून एलपीजी गॅस बाहेर काढण्यासाठी बीपीसीएलची टीम गोवा आणि उरणमधून घटनास्थळी दाखल झाली असून सर्वांच्या सहकार्याने ऑपरेशन सुरु होणार आहे. मात्र त्यानंतरही जवळपास 3 ते 4 तास वाहतूक सुरु करता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Exit mobile version