मुंबई-गोवा महामार्गाची माहिती आता एका क्लिकवर

पर्यटकांना मार्ग शोधणे होणार सुकर; क्यूआर कोडचे फलक लावण्यास सुरुवात

| रायगड | प्रतिनिधी |

कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची सर्व माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावर ठिक ठिकाणी लवकरच क्युआर कोड लावण्यात येणार आहेत.

राज्यातील महामार्गाची सुरक्षितता आणि प्रवाशांना आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. राज्यातील प्रत्येक महामार्गावर क्यूआर कोड असलेली विशेष फलक लावले जाणार आहे. याप्रमाणेच मुंबई-गोवा महामार्गावर असे फलक लावण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. महामार्गावरील या फलकावरील हा कोड स्कॅन करताच महामार्गाशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर क्यूआर कोड लावण्यात येणार असून, हा कोड स्कॅन करताच ठेकेदाराची संपूर्ण कामाची माहिती आपल्याला दिसणार आहे. याबरोबर केवळ महामार्गाची माहितीच नाहीत तर पेट्रोल पंप, पोलीस स्टेशन, ई-चार्जिंग स्टेशन, रुग्णालये व हॉटेलची माहिती ही एका क्लिकवर कळणार आहे. याबरोबर या क्यूआर कोडमुळे महामार्गावरील पुढील काही किलोमीटरमध्ये येणारे टोल नाके, पंक्चर दुरुस्तीची दुकाने तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-चार्जिंग स्टेशन्स यांची अचूक माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर अपघात किंवा वाहनात बिघाड झाल्यास नागरिक तत्काळ क्यूआर कोड स्कॅन करून गस्त टिम किंवा रेसिडेंट इंजिनियर यांच्याशी संपर्क साधने सहज शक्य होणार आहे. या क्युआर कोडमध्ये आपत्काली नंबर 1033 असून, यामुळे त्वरित मदत मिळणे सोपे होणार आहे. तसेच गस्त, टोल व्यवस्थापक, अभियंता यांचे संपर्क क्रमांक, कामाची माहिती, प्रकल्पाची लांबी, बांधकाम, देखभाल कालावधी यासह विविध माहिती आपणाला एका स्कॅनवर कळणार आहे.

क्यूआर कोडचे फलक लावण्याची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जवळील हातखंबा येथे एक क्यूआर कोडचा फलक लावण्यात आला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी कोणत्याही विशेष ॲपची आवश्यकता असणार नाही. या क्युआर कोडमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण देखील कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version