कोकणवासियांची सरकारकडे मागणी
| माणगाव | सलीम शेख |
सुंदर असा निसर्ग, समुद्र किनारे, नारळ-आंबा-सुपारी या फळांच्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बागा, फेसाळ धबधबे या गोष्टींमुळे कोकणात येण्याचा पर्यटकांचा ओघ आज मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पर्यटकांचा प्रवास सुखकर व आनंदमय होण्यासाठी कोकणतील मुंबई-गोवा महामार्ग या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. हे काम पूर्ण झाल्यास अधिकतम पर्यटकांची संख्या वाढवून निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या कोकणच्या वैभवात निश्चितच भर पडेल. तसेच वाढत्या पर्यटकांमुळे पर्यटनाला चालना मिळून कोकणवासियांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
महायुती सरकारच्या काळात समृद्धी महामार्ग, अटल सेतू यांसारखे रस्ते झाले, मात्र मुंबई-गोवा महामार्गाकडे दुर्लक्षच झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम होणे आवश्यक आहे. या महामार्गावरून दिवसातून हजारो लहान-मोठी वाहने ये-जा करीत असतात. या महामार्गाचे काम जवळपास 17 वर्षे रखडले आहे. या महामार्गावर दैनंदिन लहान-मोठे अपघात होत असतात. आजपर्यंत हजारो लोकांचे जीव या महामार्गावरील अपघातात गेले असून, अनेकजण जखमी झाले असून, अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. गणेशोत्सव काळात मुंबई-पुणे येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी कोकणात येत असतात. त्यावेळी त्यांना या महामार्गावरून येताना खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यात वाहनांचे तर नुकसान होतेच, शिवाय खड्ड्यात गाडी आपटल्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे कंबरडे मोडून त्याचा त्रास होऊन प्रवास करणाऱ्यांचा वेळ व पैसाही वाया जातो. या चाकरमान्यांना तसेच कोकणात येणाऱ्या पर्यटकांना हा महामार्ग म्हणजे डोकेदुखीचा विषय बनला आहे.
फक्त तारीख पे तारीख
मुंबई, पुण्याहून तसेच परदेशातून येणारे पर्यटक हा कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवापर्यंत पर्यटनाला जात असतो. कोकणातील हिरवीगार झाडे-झुडपे यांच्याबरोबरच श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन, गोवा येथील समुद्रातील फेसाळ लाटा यांचा मनमुराद आनंद बीचवर पर्यटक घेत असतात. शिवाय गणपतीपुळे, अष्टविनायक यांसारखी अनेक प्रसिद्ध देवस्थाने यांमुळे पर्यटकांचा जोर कोकणात वाढला आहे. कोकणाची ही शान कायम राहण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु, या कामासाठी फक्त नव्या-नव्या तारखा देण्यात येत आहेत.
दर्जेदार काम व्हावे
या महामार्गाचे काम मार्गी लागून दर्जेदार रस्त्याचे काम झाल्यास अपघातांना तर आळा बसेलच, शिवाय कोकणच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. हा महामार्ग सध्याच्या घडीला जीवघेणा महामार्ग बनला असून, लोकांचा प्रचंड आक्रोश आहे. मात्र, याकडे महायुती सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप कोकणवासियांकडून होत आहे. राज्यभरात मोठ मोठे महामार्ग बनविले जात असताना, मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.






