| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई इंडियन्सने महिला प्रीमिअर लीग 2026 मध्ये पहिला विजय मिळवला आहे. गतविजेत्यांना सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी (दि.9) झालेल्या रोमहर्षक लढतीत पराभूत केले होते. मात्र, शनिवारी (दि.11) मुंबई इंडियन्स वेगळ्याच फॉर्मात दिसली. त्यांनी सर्व आघाड्यांवर दमदार कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजयाची नोंद केली. या विजयासह, मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचण्यातही यश मिळवले आहे.
पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवातून मुंबईने धडा घेत डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला होता. एमेलिया केर (0) व गुनालन कमालिनी (16) या सलामीच्या जोडीला यावेळी अपयश आले. परंतु, नॅट शिव्हर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या दमदार फटकेबाजीने दिल्लीला बेजार केले. शिव्हर ब्रंटने सुरुवातीला कमालिनीसोबत अर्धशतकीय भागीदारी करून संघाला सावरले. त्यानंतर हरमनप्रीतसोबत धावांचा वेग वाढवला. यावेळी शिव्हर ब्रंटने 46 चेंडूंत 13 चौकारांसह 70 धावांची खेळी केली, त्यानंतर हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला. तिने 42 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 74 धावांची खळी केली. निकोला केरीनेही 12 चेंडूंत 21 धावा करून मुंबईला 4 बाद 195 धावांपर्यंत पोहोचवले.
त्यानंतर फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनीही डाव टाकला. निकोला केरीने 2 षटकांत 14 धावा देताना 3 बळी घेताना दिल्लीची अवस्थआ 5 बाद 46 अशी दयनीय केली. लिझली ली (10) हिला नॅटने बाद केले आणि कर्णधार जेमिमा रॉड्रीग्जला (1) इस्मैलने माघारी पाठवले. येथून दिल्लीला विजय मिळवणे अवघड होते. निकी प्रसाद व चिनेली हेन्री यांनी चांगली फटकेबाजी केली. परंतु, एमिलिया केरने दिल्लीला सहावा धक्का देताना प्रसादला 12 धावांवर बाद केले. हेन्रीने षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले; परंतु, धावा आणि चेंडू यातले अंतर एवढे होते की तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही. हेन्री 33 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह 56 धावांवर झेलबाद झाली. 12 चेंडूंत 60 धावा दिल्लीला हव्या होत्या आणि हातात एकच गडी शिल्लक राहिली होता. संस्कृतीने दिल्लीचा शेवटचा बळी घेऊन त्यांना 145 धावांवर सर्वबाद केले आणि मुंबईने 50 धावांनी हा सामना जिंकला. हंगामातील पहिल्या सामन्यात पराभव पत्करणाऱ्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सामन्यात उल्लेखनीय पुनरागमन केले. या विजयासह, मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचण्यातही यश मिळवले.
पहिल्या सामन्यात रोमांचक विजय मिळवणारा आरसीबी सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. 2026 मधील तीन सामन्यांनंतर, मुंबई इंडियन्स गुणतालिकेच्या आघाडीवर आहे. संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असेन एक जिंकला आहे आणि एक गमावला आहे. मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट 1.175 आहे. पहिला सामना 10 धावांनी जिंकणारा गुजरात जायंट्स दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सचे एका सामन्यानंतर 2 गुण आहेत आणि नेट रन रेट 0.500 आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा तीन गडी राखून पराभव करणारा आरसीबी महिला संघ दोन गुणांसह आणि 0.150 च्या नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.





