सलग दुसरा पराभव; चेन्नईचा विजय
| मुंबई | प्रतिनिधी |
आयपीएल 2023 मधील मुंबई विरुद्ध चेन्नई सामना चेन्नईने 7 विकेट्स राखून जिंकला. चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करत मुंबईला त्यांच्या मैदानात 157 धावात रोखले. त्यानंतर हे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव असून त्यांची गुणांची पाटी अजून कोरीच आहे.
चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 40 धावांची संयमी खेळी करत चेन्नईचा विजय तडीस नेला. त्याला शिवम दुबेने 28 धावांचे तर रायुडूने 20 धावा करून त्याला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, मुंबईचे महान फलंदाज एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनच्या वाटेवर जात असताना तिलक वर्मा (22), टीम डेव्हिड (31) आणि ऋतिक शौकीन (18) यांनी संघाची लाज वाचवली. मुंबईची अवस्था 7 बाद 113 धावा अशी झाली होती. तरी मुंबईने 20 षटकात 157 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने 3 तर मिचेल सँटरन आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने कोणतीही घाई गडबड न करता चेन्नईचा विजय तडीस नेला. शुन्यावर पहिली विकेट गमावल्यानंतर हा सामना टाईट होणार असे वाटत होते. मात्र तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने बघता बघता मुंबईचीच हवा टाईट केली. अजिंक्यने 19 षटकात अर्धशतकी मजल मारली होती. त्याने ऋतुराज गायकवाडसोबत दुसर्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. यात अजिंक्य रहाणे 27 चेंडूत 61 धावांचा वाटा होता. मात्र ही तुफानी खेळी पियुष चावलाने संपवली.