आता फक्त शनिवारी-रविवारी बेलापूर-मांडवा मुंबईमार्गे फेऱ्या
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मोठा गाजावाजा करीत गेल्या १ नोव्हेंबरपासून मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि मांडव्यादरम्यान सुरू केलेली थेट वॉटर टॅक्सी सेवा प्रतिसादाअभावी अखेर बंद करण्याची नामुष्की ‘नयनतारा शिपिंग’ कंपनीवर ओढवली. कंपनीने सोमवार ते शुक्रवार थेट सेवा बंद केली असून, यापुढे केवळ शनिवारी आणि रविवारी बेलापूर ते मांडवा मार्गे मुंबई अशी ही सेवा चालवण्यात येणार आहे.
मुंबईकरांना झटपट अलिबागला पोहोचता यावे, यासाठी १ नोव्हेंबरपासून मुंबई ते मांडवा अशी थेट वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. ही देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची, वातानुकूलित अशी ‘वॉटर टॅक्सी’ ‘नयनतारा शिपिंग’ कंपनीने सुरू केली. या वॉटर टॅक्सीने अवघ्या ४० मिनिटांमध्ये मुंबईहून अलिबागला पोहोचणे शक्य होत होते. मुंबई–मांडवा जलमार्गावर आठवडय़ाचे सातही दिवस ही सेवा सुरू होती. दिवसाला या सेवेच्या सहा फेऱ्या चालवण्यात येत होत्या. या वॉटर टॅक्सीला पर्यटक आणि प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दिवसाला केवळ २० ते २५ प्रवाशांच्या प्रतिसादावर ‘नयनतारा शिपिंग’ कंपनीला देखभालीचा खर्चही भागवणे अशक्य होत होते. त्यामुळे अखेर कंपनीने सोमवार ते शुक्रवार दरम्यानची सेवा पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मध्यंतरी या कंपनीने बेलापूर-मांडवा ‘वॉटर टॅक्सी’ सेवा सुरू केली होती. मात्र, प्रतिसादाअभावी आणि अन्य काही कारणांमुळे ही सेवा दोन दिवसांतच बंद करावी लागली होती.
कंपनी लवकरच गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर ही नवी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. ती सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस चालवण्यात येईल. बेलापूर ते मांडवा व्हाया मुंबई क्रूझ टर्मिनल आणि मांडवा ते बेलापूर व्हाया मुंबई क्रुझ टर्मिनल अशी सेवा केवळ शनिवार आणि रविवारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवातीपासूनच प्रतिसाद न मिळाल्याने तिकीट दर कमी करण्यात आले होते. ४०० आणि ४५० रुपये असलेले तिकीट दर २५० आणि ३५० रुपयांवर आणले होते. मात्र, त्यानंतरही प्रवासी संख्या वाढली नाही. २०० प्रवासी क्षमता असलेल्या वॉटर टॅक्सीमध्ये एका वेळी जेमतेम २० प्रवासी असायचे. एका फेरीसाठी कंपनीला येणारा खर्चही दिवसभराच्या फेरीतून निघत नसल्याने, अखेर सोमवार ते शुक्रवारच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला.