मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सीचा शुभारंभ

200 प्रवासी एकाच वेळी प्रवास; प्रतिप्रवाशी 400 रुपये तिकीट

| मुंबई | प्रतिनिधी |

1 नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे. दरम्यान, वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 400 रुपये मोजावे लागणार आहेत. नयनतारा शिपिंग कंपनीचे संचालक रोहित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही वॉटर टॅक्सी तयार करण्यात आली आहे. यातून जवळपास 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. तसंच या टॅक्सीमध्ये एसीचीही सुविधा आहे.

जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये वॉटर टॅक्सी सेवा थाटात सुरू केली होती. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटादरम्यान ही सेवा सुरू आहे. मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवादरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

गेट वे ऑफ इंडियापासून सेवा सुरू
लवकरच गेटवे ऑफ इंडियावरूनही वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल. सध्या मांडवा दरम्यानच्या क्रुझ टर्मिनलवरून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. येत्या 10 ते 15 दिवसांत गेट वे ऑफ इंडिया येथून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटासाठी गेटवे ऑफ इंडिया इथून वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल.

बुकिंग सुरू
1 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या वॉटर टॅक्सीसाठीचं बुकिंग सुरू झाले आहे. प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करता येऊ शकतं. सुरुवातीच्या काळात टॅक्सी सेवा सकाळी 10.30 पासून मुंबई क्रूझ टर्मिनलवरुन उपलब्ध होईल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार या वेळेत बदल केला जाऊ शकतो. गेट वे ऑफ इंडियावरुन टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत ही सेवा सुरू राहील.

Exit mobile version