‘बीसीसीआय’च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
27 मार्चपासून स्पर्धा रंगण्याची शक्यता
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामाचे आयोजन करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुंबई आणि पुणे शहराला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. 27 मार्चपासून प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत ‘आयपीएल’ खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबईत ही स्पर्धा खेळवण्याचा विचार करत आहोत, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, डी.वाय. पाटील या तीन स्टेडियमसह पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सामने खेळवता येऊ शकतात. भारतात स्पर्धेचे आयोजन करणे शक्य न झाल्यास अमिराती किंवा दक्षिण आफ्रिका येथे 15वा हंगाम खेळवण्याचा अखेरचा पर्याय आहे.
लिलावासाठी 1,214 खेळाडूंची नोंदणी
‘आयपीएल’च्या 15व्या हंगामासाठी खेळाडूंची लिलावप्रक्रिया 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरु येथे होणार आहे. या लिलावासाठी एकूण 1,214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये 896 भारतीय आणि 318 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 896 पैकी 61 खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे, तर विदेशातील 318 पैकी 209 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 59 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.
राहुलला 17, तर हार्दिकला 15 कोटी
‘आयपीएल’च्या आगामी हंगामात प्रथमच सहभागी होणार्या लखनऊ आणि अहमदाबाद संघाचे नेतृत्व अनुक्रमे के.एल. राहुल आणि हार्दिक पंड्या करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लखनऊने राहुलला तब्बल 17 कोटी रुपयांना करारबद्ध केले असून, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोयनिसचा 9.2 आणि फिरकीपटू रवी बिश्नोईचा 4 कोटी रुपयांमध्ये संघात समावेश करण्यात आला. अहमदाबादच्या हार्दिक आणि फिरकीपटू रशीद खानला प्रत्येकी 15 कोटी देण्यात येतील, तर शुभमन गिलला सात कोटी रुपयांत करारबद्ध केले.