मुंबई आठवड्याभरात निर्बंधमुक्त होणार?

कोविड पॉझिटिव्हीटी रेट १ टक्क्यापेक्षा कमी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोविड निर्बंधात शिथिलता येऊन पंधरवडा झाल्यानंतर मुंबईत रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्या ‍खाली आला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरातील कोविड परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्बंध अधिक शिथिल होण्याची शक्‍यता आहे. परिस्थिती सुधारल्यास सर्वच निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याबरोबर कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
मुंबईत आज ३९ हजार ५९२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३४९ कोरोनाबाधित आढळले. कोविड पॉझिटिव्हिटीचा दर ०.८८ टक्‍क्‍यांवर आहे. त्याचबरोबर यापूर्वीचे कोविड निर्बंध हटवून १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्याच्या ‍खाली आहे.
१४ दिवसांत कोविड पॉझिटिव्हिटी दर वाढला असता तर संसर्ग वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट झाले असते. मात्र, आता तशी परिस्थिती नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. कोविड नियंत्रणात असल्याने येत्या आठवड्याचा आढावा घेऊन निर्बंधांत अधिक शिथिलता आणण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही त्याने सांगितले. ‘पुढील आठवड्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत राज्याच्या टास्क फोर्सला माहिती सादर केली जाईल,’ असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Exit mobile version