| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यात सागरमाला अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करतानाच नवीन प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून मागणी करण्यात येईल. महाराष्ट्रात पुढील दीड वर्षांत रो-रो सेवेचे चार प्रकल्प सुरू करण्यात येतील. त्यामध्ये मुंबई ते मोरा, मुंबई ते काशीद, मुंबई ते दिघी, मुंबई ते रेवस कारंजा यांचा समावेश आहे.
केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, मुंबई मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी आदी अधिकारी उपस्थित होते.
लोथल येथे साकारत असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे दालन असावे आणि त्याठिकाणी आरमार विषयी चित्रमय प्रदर्शनासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, रो-रो सेवेसाठी बंकर फ्यूलला लावला जाणारा वॅट कमी करण्यात यावा, तसेच जुन्या प्रवासी बोटींचे अद्ययावतीकरण करण्यात यावे, पर्यावरणपूरक बोटींची समावेश याविषयी देखील चर्चा करण्यात आली.