मुंबईने जिंकला रणजी चषक


| मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये बाजी मारून 8 वर्षानंतर चषक उंचावला. अंतिम सामन्यात मुंबईने दिलेल्या 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाने चिवट खेळ करताना चौथ्या दिवसअखेर 92 षटकांत 5 बाद 248 धावा केल्या होत्या. करुण नायरने विदर्भाच्या आशा कायम राखताना 220 चेंडूंत 74 धावा केल्या होत्या; परंतु दिवसातील 32 चेंडू शिल्लक असताना करुणला बाद करीत मुशीर खानने मुंबईला पूर्ण पकड मिळवून दिली. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने पाचव्या दिवशी शतक झळकावून खिंड लढवली होती. पण, 199 चेंडूंत 102 धावांवर तो बाद झाला आणि मुंबईचा विजय पक्का झाला. मुंबईने 169 धावांनी सामना जिंकला. अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळणार्‍या धवन कुलकर्णीला कर्णधार अजिंक्य रहाणेने चेंडू दिला आणि त्याने शेवटचा बळी घेत मुंबईचा विजय पक्का केला.

मुंबईकडून तनुष कोटियनने 4, तुषार देशपांडे व मुशीर खान यांनी प्रत्येकी 2, तर शाम्स मुलानी व धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. विदर्भाचा दुसरा डावा 368 धावांवर गडगडला. मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या, पण, विदर्भाला 105 धावाच करता आल्याने मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली. त्यात मुंबईने दुसर्‍या डावात 418 धावा करून विदर्भासमोर तगडे लक्ष्य ठेवले. विदर्भाची चौथ्या डावातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्यांनी 4 डिसेंबर 2010 मध्ये सर्व्हिसच्या 353 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 350 धावांपर्यंत मजल मारली होती. अवघ्या 3 धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ 2024 च्या रणजी चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाचा पराभव करून 42 व्यांदा चॅम्पियन बनला. यापूर्वी ती 2015-16 मध्ये चॅम्पियन बनली होती. मुंबईचा संघ 48 व्यांदा रणजी फायनलमध्ये पोहोचला होता. तर विदर्भाने तीनदा अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या डावात 105 धावांत गुंडाळल्यानंतर विदर्भाने दुसर्‍या डावात जबरदस्त झुंज दाखवली. या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सोडला तर उर्वरित चारही दिवसात मुंबई संघाचे वर्चस्व दिसून आले.

अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विदर्भ संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 गडी गमावून 248 धावा केल्या होत्या. यानंतर संघाला कर्णधार अक्षर वाडकरकडून विजयी खेळीची अपेक्षा होती. पाचव्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात विदर्भ संघाने एकही गडी गमावला नाही, मात्र त्यानंतर दुसर्‍या सत्रात मुंबई संघाने दमदार पुनरागमन करताना प्रथम अक्षय वाडकरला वैयक्तिक 102 धावांवर तंबूमध्ये पाठवले. आणि हर्ष दुबेलाही 65 च्या वैयक्तिक धावसंख्येवर तंबूमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर मुंबईने विजयाच्या दिशेने पावले टाकली. येथून विदर्भाचा डाव गडगडण्यास जास्त वेळ लागला नाही आणि संपूर्ण संघ 368 धावांवर आटोपला.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली या रणजी मोसमात मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती, ज्यात त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. एकात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर बडोदाविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अनिर्णित राहिला तेव्हा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्‍चित करण्यात यशस्वी ठरला. जिथे त्यांनी तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला. आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्‍चित केले. मुंबईसाठी या रणजी मोसमात सर्वाधिक धावा भूपेन लालवानीने केल्या, ज्याने 10 सामन्यांत 39.2 च्या सरासरीने 588 धावा केल्या. मोहित अवस्थीने संघाकडून सर्वाधिक बळी घेतले, ज्याने 8 सामन्यात 35 बळी घेतले.

मुंबई क्रिकेट संघाने विक्रमी 42 वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकली. आणि त्यांच्यावर बक्षीसाचा वर्षाव झाला. बीसीसीआयकडून विजेत्या संघाला 5 कोटींचे बक्षीस दिले जाते. त्यात मुंबई क्रिकेट असोसिएशननेही 5 कोटींचं बक्षीस जाहीर केले. त्यामुळे रणजी करंडक विजेत्या मुंबईच्या संघाला 10 कोटीची लॉटरी लागली आहे. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आणि अ‍ॅपेक्स कौन्सिलने रणजी करंडक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीए मुंबई रणजी करंडक विजेत्या संघाला अतिरिक्त 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version