रहाणे, शार्दुल, तुषार देशपांडेच्या पुनरागमनामुळे ताकद वाढली
| रायपूर | वृत्तसंस्था |
पाच सामन्यांत चार मोठे विजय आणि सर्वाधिक 27 गुणांसह ‘ब’ गटात आघाडी अशी यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत वाटचाल करणार्या मुंबईचा उद्यापासून सुरू होणार्या सामन्यात छत्तीसगड संघाविरुद्ध सामना होत आहे. काही प्रमुख खेळाडू संघात परतले असल्यामुळे मुंबईची ताकद अधिकच वाढली आहे. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीतही मुंबई संघाची ताकद अधिक आहे. आता अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे हे खेळाडू संघात परतल्यामुळे मुंबईचा संघ अधिक ताकदवर झाला आहे.
सर्वाधिक 27 गुणांची कमाई करणार्या मुंबईचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. आता केवळ त्यावर शिक्कामोर्तब होणे शिल्लक आहे. छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यातून मुंबई संघाला हे उद्दिष्ट पार करायचे आहे. एकीकडे संघ म्हणून प्रगती होत असताना प्रमुख फलंदाजांना अजून अपेक्षित सूर सापडलेला नाही किंवा ज्यांनी धावा केल्या आहेत त्यांना सातत्य राखता आलेले नाही. सुरुवातीचा फलंदाज लवकर बाद झाल्यावर तळाच्या फलंदाजांनी डाव सावरलेला आहे.
आता फारसे दडपण नसल्यामुळे प्रमुख फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि याची सुरुवात कर्णधार अजिंक्य रहाणेपासून सुरू होणार आहे. दुखापतीमुळे तो दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता आणि ज्या तीन सामन्यांत खेळला. त्यापैकी दोन सामन्यांत तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
गहुंजे स्टेडियमवर उद्यापासून महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात ‘अ’ गटातील सामना होत आहे. विदर्भने पाच सामन्यांतून सर्वाधिक 20 गुण मिळवत आघाडी घेतली आहे, तर पाचपैकी दोन सामने गमावणार्या आणि दोन सामने अनिर्णित राहिलेला महाराष्ट्राचा संघ सहाव्या स्थानावर आहे. बाद फेरीसाठी त्यांना आपले आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर बोनस गुणासह विजय आवश्यक आहे. तरीही पुढचा प्रवास सोपा होईल असे नाही.