मुंबईचा सलग पाचवा विजय

शार्दुलची अष्टपैलू कामगिरी

| मुंबई | प्रतिनिधी |

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड मुंबईने कायम ठेवली. चेतेश्वर पुजारा खेळत असलेल्या सौराष्ट्र संघावर 5 गडी आणि 92 चेंडू राखून विजय मिळवला. सलग पाचव्या विजयामुळे मुंबईने बाद फेरी निश्चित केली.

शार्दुल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईचा विजय सोपा झाला. शार्दुलने 37 धावांत 2 गडी बाद केले आणि नाबाद 39 धावांची खेळी केली. मुंबईच्या या विजयात गोलंदाजांची कामगिरी अधिक प्रभावी ठरली. त्यांनी सौराष्ट्रचा डाव 40.5 षटकांत 144 धावांत गुंडाळला. त्यानंतर विजयी आव्हान 34.4 षटकांत पूर्ण केले, परंतु मुंबईने निम्मा संघ 76 धावांत गमावला होता. त्यावेळी बाद झालेल्या फलंदाजांमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचा समावेश होता.

थोडेसे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असताना यष्टीरक्षक फलंदाज प्रसाद पवार आणि शार्दुल ठाकूर यांनी नाबाद 74 धावांची भागीदारी करून मुंबईचा विजय सोपा केला. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला 12 धावाच करता आल्या, परंतु त्याच्यासह आता भारतीय संघातून दूर असलेल्या चेतेश्वर पुजाराने नाबाद 55 धावा करून सौराष्ट्रचा डाव सावण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

सौराष्टाची 8 बाद 114 अशी घसरगुंडी उडाली होती. एक बाजू पुजारा लढवत असताना धर्मेंद्रसिंग जडेजा आणि जयदेव उनाडकट या तळाच्या फलंदाजांनी प्रत्येकी 10 धावांचे योगदान दिले. त्यामुळे त्यांना 144 धावांपर्यंत मजल मारता आली.

Exit mobile version