हैदराबादच्या विजयाने मुंबईचा ‘खेळ खल्लास’

यंदाच्या हंगामातून बाहेर पडणारा पहिला संघ

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. हैदराबादने 10 गडी राखून हा ऐतिहासिक विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटाकांमध्ये चार गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना हैदराबाद संघाने 9.4 षटकांमध्ये 166 धावांचे लक्ष्य गाठलं. हैदराबादने 62 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला अन् मोठ्या विक्रमाची नोंद केली. याचबरोबर हैदराबादने गुणतालिकेत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. तर, दुसरीकडे आता मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधून पत्ता कट झाला आहे.

हैदराबादने लखनऊचा पराभव केल्यामुळे आता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या यंदाच्या हंगामामधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. आजच्या विजयामुळे आता हैदराबादचा संघ 14 गुणांसह तिसर्‍या स्थानी पोहोचला आहे. तर पहिल्या आणि दुसर्‍या स्थानी अनुक्रमे कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 16-16 गुणांसह कायम आहे. तर चेन्नई 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्याचबरोबर लखनऊ आणि दिल्लीच्या खात्यातदेखील 12-12 गुण आहेत. येत्या (दि.14) मे रोजी लखनऊ आणि दिल्लीचा सामना होईल. यात कोणताही संघ जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील. सामना जरी ड्रॉ झाला तरी दोन्ही संघांकडे कमीत कमी 13-13 अंक गुण असणार आहेत. हेच गुण मुंबईच्या गुणांपेक्षा जास्त असतील.

मुंबई इंडियन्सच्या खात्यात आता 8 गुण आहेत. तर त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई कितीही जोर लावला तरी मुंबईकडे 12 च गुण होतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुंबईला 13 गुण घेता येणार नाहीत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

Exit mobile version