मुंबईचे पॉवर ग्रीड पुन्हा ढेपाळले

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पावर ग्रिड यंत्रणा ढेपाळल्यामुळे मुंबई,नवी मुंबई, ठाणे, पालघर येथे तब्बल दोन तास वीजपुरवठा खंडित होण्याची घटना आठवडा भरापूर्वी घडली होती राज्याची राजधानी आणि एकविसाव्या शतकातील शहरात जर ही परिस्थिती ओढावत असेल तर मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प तातडीने पूर्ण होणे ही काळाची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

बुधवार ( ता.12) मुंबई शहराचा काही भाग, ठाणे शहर, नवी मुंबई, पालघर मधील ग्रामीण क्षेत्र या विभागातील वीज पुरवठा सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान अचानक खंडित झाला. याचा फटका पनवेल परिसरातील ग्राहकांना देखील बसला. येथे तर पुढील तीन ते चार दिवस वीज प्रवाह सातत्याने खंडित होत होता. ऐन उन्हाळ्यात काहीली होत असताना तब्बल वीस लाख उपभोक्त्याना वीज प्रवाह खंडित होण्याचा नाहक जाच सहन करावा लागला. वीज प्रवाह खंडित होण्याने ग्राहकांना बत्ती गुल ची आठवण झाली. नुसत्या विचारानेच ग्राहकांची हबेलांडी उडाली. वास्तविक इतक्या महत्त्वपूर्ण विभागात पर्यायी वितरण व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

मुंबई महानगर प्रदेशात झपाट्याने विकास होत आहे. महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती, कारखाने, केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि या सार्‍यांच्या अनुषंगाने झपाट्याने वाढणारी नागरी वस्ती यामुळे अतिरिक्त विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. विजेच्या वाढत्या वापरामुळे पावर ग्रीड फेल होण्याचा पूर्वी फक्त धोका होता पण आता मात्र प्रत्यक्षात पॉवर ग्रीड फेल होऊ लागलेली दिसत आहेत. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशांमध्ये पर्यायी वीज वितरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. वाढत्या विजेच्या मागणी करता स्वस्त दरातील वीज उपलब्ध जरी असली तरी ती मुंबई महानगर प्रदेशापर्यंत आणण्यासाठी उच्च दाबाच्या वाहिन्यांचा कॉरिडॉर बनविणे क्रमप्राप्त झाले आहे. जितक्या लवकर वीज वाहक कॉरिडोर तयार होईल तितका पावर ग्रीड फेल होण्याचा धोका टळेल.

अखंड वीज प्रवाह म्हणजे विकासाची गुरुकिल्ली! म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीखाली मुंबई ऊर्जा मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाकरिता वॉर रूम देखील उभारण्यात आली असून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना त्या स्वरूपाचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version