मुंबईचा ‘रॉयल’ विजय

राजस्थानवर अखेरच्या षटकात मात

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई इंडियन्सने रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेला आयपीएलमधील एक हजारावा सामना मोठ्या दिमाखात जिंकला. मुंबई इंडियन्ससमोर अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असताना टीम डेव्हिडने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर सलग तीन चेंडूंवर तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला सहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सचा हा मोसमातील चौथा विजय ठरला. राजस्थान रॉयल्सला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

राजस्थानकडून मुंबईसमोर 213 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बर्थ डे बॉय रोहित शर्मा 3 धावांवरच त्रिफळाचित झाला. त्यानंतर इशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी 62 धावांची भागीदारी करताना मुंबईच्या आशा कायम ठेवल्या. रविचंद्रन अश्‍विनने इशानला 28 धावांवर आणि ग्रीनला 44 धावांवर बाद करीत मुंबईला धक्के दिले.

त्यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्माच्या साथीने मुंबईसाठी किल्ला लढविला. दोघांनी 51 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 29 चेंडूंमध्ये 55 धावांची खेळी केली. ट्रेंट बोल्टने त्याला बाद करीत राजस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी संदीप शर्माने धावत जाऊन पकडलेला झेल लाजवाब होता. शेवटी तिलक वर्मा (नाबाद 29 धावा) व टीम डेव्हिड (नाबाद 45 धावा) यांनी मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल व जॉस बटलर या फॉर्ममध्ये असलेल्या सलामी जोडीने 72 धावांची भागीदारी करताना मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अर्थात, यामध्ये बटलरचा वाटा फक्त 18 धावांचा. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर बटलर बाद झाला आणि जोडी तुटली.

यानंतर यशस्वीने एका बाजूने आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. पण दुसर्‍या बाजूने कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. संजू सॅमसन (14 धावा), देवदत्त पडीक्कल (2 धावा), जेसन होल्डर (11 धावा), शिमरॉन हेटमायर (8 धावा), ध्रुव जुरेल (2 धावा) यांच्याकडून निराशा झाली. पण यशस्वीच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थानला 7 बाद 212 धावा फटकावता आल्या.

यशस्वीने 62 चेंडूंमध्ये 16 चौकार व 8 षटकारांसह 124 धावांची संस्मरणीय शतकी खेळी साकारली. अर्शदने त्याला बाद केले. अर्शद याने 39 धावा देत 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पियूषने 34 धावा देत 2 फलंदाज बाद केले.

Exit mobile version