| मुंबई | प्रतिनिधी |
रणजी चषकाच्या चौथ्या फेरीत मुंबईने हिमाचल प्रदेशविरुद्ध दमदार सुरुवात केली. मुशीर खान आणि सिद्धेश लाड यांनी शतके ठोकत मुंबईचा डाव सावरला. रणजी चषक 2025-26 स्पर्धेत चौथ्या फेरीला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या फेरीत मुंबईचा सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध बीकेसी ग्राऊंड-मुंबई येथे होत आहे.
हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबईने नाणेफेर जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मुंबईने आयुष म्हात्रेच्या रुपात दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. तो 9 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणेही 2 धावांवर बाद झाला. तर, हिमांशु सिंगलाही शून्यावर बाद झाला. त्यामुळे मुंबईची अवस्था 3 बाद 35 धावा अशी झाली होती. त्यानंतर एक बाजू सांभाळणाऱ्या सलामीवीर मुशीर खानला काही काळ त्याचा मोठा भाऊ सर्फराज खानने साथ दिली. परंतु, सर्फराजही फार काळ टिकू शकला नाही. तो 16 धावांवर पायचीत झाला. त्यानंतर मुशीरल आणि सद्धेश लाड या दोघांनी डाव सावरण्यास सुरुवात केली. बघता बघता दोघांमध्ये दीडशे धावांची भागीदारीही झाली. दरम्यान, मुशीरचे शतकही पूर्ण झाले. त्यामुळे हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक ठरले. परंतु, शतकानंतर 112 धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर सिद्धेशनेही त्याचे शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा मुंबईच्या 88 षटकात 5 बाद 289 धावा झाल्या होत्या. सिद्धेश लाडने नाबाद 100 धावा केल्या आहेत, तर त्याच्यासोबत आकाश 26 धावा करून नाबाद खेळत आहे.







