। मुंबई । प्रतिनिधी ।
अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर यांनी मोठे विधान केले आहे. तसेच, ऑफिस ऑफ फ्रॉफीटचा आरोप होत आहे. सोनिया गांधींवर ऑफिस ऑफ फ्रॉफीटचे आरोप झाले तेव्हा सोनियाजी मंत्रीही नव्हत्या. त्या फक्त खासदार होत्या तरीही त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता. आणि संतोष देशमुख यांची हत्या हा राजकीय विषय नाही, हा सामाजिक विषय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महायुती सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या निशाणा साधला आहे.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही काय मागणी करतोय, सगळेच पक्ष आहे, त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही समावेश आहे. कुठला पक्ष राजीनामा मागत नाही आहे. त्यांचा स्वतःचा पक्षही राजीनामा मागत आहे. तसेच, राजीनामा आम्ही नैतिकतेवर मागत आहोत. लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीत करत आहोत. पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज नवीन पुरावा समोर येत आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला.
अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ या सगळ्यांना ऐकिव बातम्यांवर अटक झाली होती. वर्ष-वर्ष जेलमध्ये होते. इथे तर पुरावेही आहेत. आणि सत्तेमधले आमदारही मागणी करत आहेत. आम्ही विरोधक आहोत, आम्ही एकतर्फी असू. शिवसेना, काँग्रेस सगळे विरोधक बाजूला ठेवा. परंतु, सत्तेतील तिन्ही पक्षाचे लोकही तेच म्हणत आहेत. धनंजय मुंडे यांना वाचवले जात असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, 50 दिवस झाले एक फरार माणूस सरकारला मिळत नाही. काय करतेय यंत्रणा? हा गंभीर प्रश्न आहे, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला केला आहे.