प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा न्यायासाठी संघर्ष
| पेण | वार्ताहर |
देश 21व्या शतकात प्रगतीच्या मार्गावर असताना, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडी मात्र अजूनही मूलभूत सुविधा आणि हक्काच्या रस्त्यापासून वंचित आहे. स्वातंत्र्याचा 75वा अमृतमहोत्सव आणि चांद्रयान यांसारख्या मोठ्या उपलब्धींना देशभरात जल्लोष साजरा केला गेला असतानाही या छोट्याशा वाडीतील परिस्थिती आजही जैसे थे आहे.
मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना हक्काचा रस्ता मिळावा यासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात असलेल्या या वाडीला आजवर पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. बेलवडे व मुंगोशी भागात रस्ते आहेत, परंतु बौद्धवाडीकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नाही. या वाडीतील लोकांना दोन शेतांमधून आणि झाडीझुडपांतून पायवाट काढत साप-विंचू यांच्या भीतीतून प्रवास करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची स्थिती अधिकच बिकट होते. शाळकरी मुलांना, आजारी व्यक्तींना आणि गर्भवती महिलांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच वैद्यकीय आपत्कालीन सेवा वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक आजारी व्यक्तींचे प्राण गेले आहेत. गावात कोणतेही वाहन येऊ शकत नसल्यामुळे वाहने गावाबाहेरच पार्क करावी लागतात. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिल्यानंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदने दिली असूनही या समस्येचे निराकरण झालेले नाही. 2018 साली जिल्हा परिषदेकडून रस्त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. नकाशात रस्ता क्रमांक 134 असा नोंदवलेला असूनही प्रत्यक्षात रस्ता निर्माण झालेला नाही. या परिस्थितीमुळे मुंगोशी बौद्धवाडीला मूलभूत सुविधा मिळत नाहीत. सार्वजनिक शौचालये जीर्ण झाली आहेत, पथदिव्यांचे लोखंडी खांब वाकले असून ते कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ग्रामस्थ हिरामण भोजने आणि इतरांनी अनेक वर्षे प्रशासनाचे उंबरठे झिजवले असतानाही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. राज्य शासनाची मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना आणि तहसीलदारांच्या अधिकारांतर्गत रस्ता खुला करण्याचे अनेक पर्याय असतानाही याप्रश्नावर तोडगा निघाला नाही. गावातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात असल्याचा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. वाडीतील रहिवाशांना मुलभूत हक्क अधिकारातून हक्काचा रस्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे, पण ती प्रतीक्षा कधी संपेल, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.
100 वर्षांहून अधिक काळ लोटला असून आम्ही लहानपणापासून पाहत आलोय की, आमच्या बौद्धवाडीला अद्याप हक्काचा रस्ता मिळालेला नाही. वाडीतील व्यक्ती आजारी पडला तर त्याला झोळीमध्ये घेऊन न्यावे लागते. शाळेतील विद्यार्थी, महिला, कामगार यांना पावसाळ्यात गवत, झाडीझुडपांतून पायवाट काढत साप-विंचू यांच्या भीतीतून प्रवास करावा लागतो. प्रशासनाकडे खूप वेळा अर्ज विनंती करूनदेखील आम्हाला रस्ता मिळत नाही. प्रशासनाला आमची दया कधी येईल?
– हिरामण भोजने, ग्रामस्थ, मुंगोशी बौद्धवाडी