। पालघर । प्रतिनिधी ।
काशीमिरा माशाचा पाडा येथील दर्ग्याच्या लगत अनधिकृत गोडावूनच्या बांधकामावर महापालिका प्रभाग कार्यालय क्र. 6 च्या अधिकार्यांनी तोडक कारवाई केली आहे. याप्रकरणी तक्रारदार व बांधकाम संबधित व्यक्तींची आपापसात बाचाबाची झाल्यानंतर या प्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कामात महापालिका अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकाम माफियांनी जागोजागी अनधिकृत बांधकामाचा सपाटा सुरू केला होता. दोनच दिवसांपूर्वी आयुक्त संजय काटकर यांनी महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकार्यांची आढावा बैठक घेऊन शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. काशीमिरा माशाचा पाडा परिसरात दर्ग्याच्या लगत टोलेजंग अनधिकृत गोडावूनचे बांधकाम करण्यात आले होते. त्याबाबत काही दक्ष नागरिकांनी प्रभाग कार्यालय क्र. 6 मध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी तक्रारदार व संबंधित बांधकाम व्यवसायी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. प्रकरण पोलीस ठाण्यासह पालिका आयुक्तांपर्यंत पोहोचले होते. अखेर गुरुवारी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करून बांधकाम जमिनदोस्त करण्यात आल्याचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण अधिकारी सहा. आयुक्त नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.