निकृष्ट बांधकामांचा धुमाकूळ; कामगारांच्या सुरक्षेची पायमल्ली
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपालिका निवडणुकी काळातही शहरात पुनर्विकासाच्या नावाखाली मोठमोठे टॉवर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडून बिल्डरांना अभय मिळत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्याधिकारी समीर जाधव, नगररचनाकार निकम आणि बांधकाम विभागाच्या संरक्षणछत्राखाली अनेक प्रकल्पांवर निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून, कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे देखील उघड झाले आहे.
उरणमध्ये नगरपालिका निवडणूकीची धामधूम सुरू असताना विमला तलाव परिसरात एका इमारतीचे काम सुरू आहे. त्या इमारतीवरून साहित्य कोसळून एका कामगाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांकडून या अपघाताबाबत कोणतीच खबरदारी न घेतल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच अशा गंभीर अपघाताची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात नसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जखमी कामगारासह इतर कामगारांकडे विचारणा केली असता, आम्ही कितीही मागणी केली तरी बिल्डर आम्हाला कोणतीही सुरक्षा उपकरणे देत नाही, अशी थेट कबुली त्यांनी दिली. तर, बिल्डरकडे विचारणा केली असता, हे काम मी दुसऱ्याला दिले आहे. त्यामुळे ही माझी जबाबदारी नाही, असे सांगून त्यांनी जबाबदारी पूर्णपणे झटकून टाकली. त्यामुळे कामगारांच्या जीवाशी निगडित सुरक्षेच्या प्रश्नावर अशी बेफिकिरी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.
उरण शहरातील अनेक पुनर्विकास प्रकल्पांमध्येही नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. आनंदनगर परिसरातील इमारत रस्त्याच्या कडेलाच उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासकीय कारभार गेली काही वर्षे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखालीच चालल्याने या अनियमिततेकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे आरोप कायम आहेत. उरण शहरातील बांधकामातील अनियमितता, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि कामगारांच्या सुरक्षेचा बोजवारा यावर तात्काळ लक्ष देण्याची गरज असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.







