विदेशातून आलेल्यांवर महापालिकेचे लक्ष

। नवी मुंबई । वार्ताहर ।
कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे जगभरात भीती पसरली असतानाच नवी मुंबईतील नागरीकही धास्तावले आहेत. विदेशातून प्रवास करून शहरात आलेल्या सर्व नागरिकांवर महापालिकेचे लक्ष असून विदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 143 इतकी आहे. महापालिकेतील प्राप्त झालेल्या यादीनुसार विदेशातून शहरात आलेल्या नागरीकांची संख्या जवळपास 400 पर्यत जाण्याची शक्यता आहे. प्रवाशांसह संपर्कात आलेल्यांची चाचणी केली जात असून उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. देशात तसेच राज्यात ओमायक्रॉनचे काही रूग्ण आढळून आल्याने प्रशासन, शासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विदेशातून प्रवास केलेल्या नागरिकांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्यांचे त्याच ठिकाणी विलगीकरण केले जाते. कोणतीही लक्षणे नसलेल्या आणि अहवाल निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना सात दिवस होत आयसोलेशनचा सल्ला दिला जातो. तसेच या नागरिकांच्या राहत्या पत्त्यानुर स्थानिक प्राधिकरणाला प्रवाशाचे नाव, पत्ता, वय, प्रवासाचे ठिकाण, तारीख आदी सर्व माहिती देण्यात येते.


महापालिकेच्या माध्यमातून विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रत्येक नागरीकावर लक्ष ठेवण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रत्येक नागरीकाची आठव्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. तसेच पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची देखील चाचणी करण्यात येत आहे. विदेशातून प्रवास करून आलेल्या नागरीकांची माहिती संबंधित सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना देखील देण्यात येत असून महापालिकेच्या आरोग्य विभागचे प्रत्येक नागरीकावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Exit mobile version