। पालघर । प्रतिनिधी ।
वसई-विरार महापालिकेच्या कचरा भूमीवरील कचर्याचे साचलेले डोंगर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बायोमायनिंग प्रकल्पाच्या द्वारे आतापर्यंत सव्वा दोन लाख मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया करण्यात आली असून अजूनही संपूर्ण कचरा नष्ट करण्यासाठी दोन वर्षे इतका कालावधी लागणार आहे.
शहरात वाढत्या नागरिकरणामुळे दैनंदिन निघणार्या कचर्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज शहरातून आठशेहून अधिक मेट्रिक टन इतका कचरा संकलित करून गोखीवरे येथील कचरा भूमीवर नेऊन टाकला जात आहे. यापूर्वी कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेचा कोणताही प्रकल्प नसल्याने विल्हेवाटीसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे एका वर एक असे कचर्याचे ढिगारे साचून त्याचे डोंगर तयार झाले होते. या वाढत्या कचर्यामुळे कचरा टाकण्यास ही पालिकेला जागा अपुरी पडत होती. या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा भूमीवर बायोमायनिंग प्रकल्प सुरू केला आहे. मे साई युटिलिटी या संस्थेला वीस वर्षांसाठीचे काम देण्यात आले आहे. सुमारे 15 लाख मॅट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया करण्याचे काम 15 जानेवारी पासून सुरू करण्यात आले आहे. ट्रॉमल यंत्रणेद्वारे कचर्याचे वर्गीकरण करण्यात येते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे.
विल्हेवाट प्रक्रियेला वेग
कचर्याच्या डोंगरांच्या विल्हेवाट प्रक्रियेला वेग आला असून विल्हेवाटीसाठी 3 ट्रॉमल यंत्र असून त्याद्वारे काम सुरू आहे. आतापर्यंत पालिकेच्या कचरा भूमीवरील सव्वा दोन लाख मॅट्रिक टन इतक्या कचर्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली असल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. उर्वरित कचर्यावर टप्प्या टप्प्याने विल्हेवाट लावली जात आहे. संपूर्ण कचरा मोकळा करण्यासाठी साधारणपणे दोन वर्षे इतका कालावधी लागेल असे पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले आहे.