। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंकज भुसे यांची नुकतीच नवी मुंबई संचालनालयात सहाय्यक संचालकपदी पदोन्नती झाली आहे. सप्टेंबर 2021 ते सप्टेंबर 2024 या तीन वर्षांच्या कालावधीत पंकज भुसे यांनी नगरपरिषदेचा पदभार सांभाळला.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात मुरुड शहराचा अंतरबाह्य कायापालट झाला आहे. नगरोथ्यान योजनांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, श्रीदत्त मंदिर परिसर सुशोभिकरण, समुद्रकिनारा सुशोभिकरण, शहरातील रस्ते तसेच उद्यानांची सुधारणा, नगरपरिषद इमारत नूतनीकरण, नगरपरिषद विश्रामगृह, सर्व नगरपरिषद शाळा नूतनीकरण संगणीकृत शाळा, अग्नीशमन कार्यालय, मुख्याधिकारी निवास स्थान आदी विविध विकास कामे झाली असून, पर्यटननगरीचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे.