अलिबागकरांच्या आरोग्यासाठी नगरपरिषदेचे पाऊल

ओपन जीममध्ये नविन उपकरणांचे लोकार्पण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या शेकापक्षाचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी विविध उपक्रमाद्वारे अलिबागचे नावलौकिक वाढविण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न केले आहेत. त्यातच अलिबागकरांना आणख सुदृढ बनविण्यासाठी अलिबाग समुद्रकिनारा तसेच हिराकोट तलाव परिसरात ओपन जिम बसविण्यात आल्यानंतर आता पुन्हा समुद्रकिनार्‍यावरील ओपन जीममध्ये आणखी नविन उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण नगरसेविका वृषाली ठोसर यांच्या हस्ते करण्यात आले.
दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांची राजधानी आणि कुलाबा किल्ला तसेच सुंदर समुद्र किनारा लाभलेले अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवत आहे. शेतकरी कामगार पक्षाची अबाधीत सत्ता असलेले आणि जिल्ह्याचे मुख्यालय असणारे अलिबाग शहर कसे अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर दिसेल याचा ध्यास घेतलेले शेकापक्षाचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आतापर्यंत अलिबाग शहर पर्यटनांसाठी जास्तीत जास्त कसे आकर्षण ठरेल याचा प्रयत्न केला आहे. नगरपरिषदेला शासनाकडून आवश्यक तितकासा निधी मिळत नसताना शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, पंडित पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देत शहराचा सर्वतोपरी सर्वांग विकास केला जात आहे. त्याला प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या माध्यमातून देखील विविध उपक्रम राबवून जोड देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय सैन्यदलाचा रणगाडा, अलिबाग बिच सेल्फि पाँईंट, विविध बगिचे, उद्यान समुद्रकिनार्‍यावरील शेड, सुंदर असे सुशोभिकरण करीत आणखी सुंदर अलिबाग बनविण्यात प्रशांत नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे.
या सर्व विकासाबरोबरच शहरातील नागरिकांचे आरोग्य कशा प्रकारे सुदृढ राहील या विचारातून ओपन जिमची संकल्पना काही वर्षांपूवी समुद्रकिनारा तसेच हिराकोट तलाव येथे राबविली होती. या ओपन जिमला चांगला प्रतिसाद लाभत आहे. आता समुद्रकिनारी अलिबाग नगरपरिषद तर्फे ओपन जीमची तीन नविन उपकरणे बसवण्यात आली आहेत. या व्यायामाच्या नविन उपकरणांचे जेष्ठ नगरसेवीका वृषाली ठोसर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह नगरसेवीकासुषमा पाटील, संजना किर, अनिल चोपडा आदी उपस्थित होते.

Exit mobile version