बाजारपेठेला अनधिकृत पार्किंगचे ग्रहण
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
काही वर्षांपूर्वी श्रीवर्धन नगरपरिषदेने कोपरी मार्ग नाल्यावर काँक्रीटचा रस्ता तयार करून या ठिकाणाहून दुचाकी वाहनांसह पादचारी जातील अशा प्रकारची सोय उपलब्ध करून दिली. परंतु, या रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत गाळे बांधण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच या रस्त्याला अनधिकृत पार्किंग आणि रिक्षा स्टँडचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना पादचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, येथील अनधिकृत बांधकामांना नगरपरिषदेने अभय दिल्याचे देखील स्थानिकांमधून बोलले जात आहे.
श्रीवर्धन पेशवे आळी येथून श्रीवर्धन बाजारपेठेकडे जाण्याऱ्या कोपरी मार्ग या नाल्यावर श्रीवर्धन नगरपरिषदेने काँक्रीटचा रस्ता बनवला. हा काँक्रीट रस्ता दुचाकी व पादचाऱ्यांसाठी असला तरीही या मार्गावरून तीन आसनी रिक्षा, त्याचप्रमाणे काही चारचाकी वाहने देखील नियमितपणे जात असतात. तसेच, या मार्गाच्या दुतर्फा काही बांधकाम व्यवसायिकांनी अनधिकृत दुकान गाळे बांधले आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदी देखील कमी झाली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनधिकृतपणे अनेक दुचाकी वाहने पार्किंग केलेली पाहायला मिळतात. तसेच, या मार्गावरती न्यू आपला बाजार हे सुपर मार्केट असून त्याच्यासमोर अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड तयार झालेला आहे. या मार्गावर सतत वाहतुकीची वर्दळ वाढल्यामुळे या ठिकाणी टाकलेला स्लॅब देखील उखडून निघाला आहे. अनेक ठिकाणी स्लॅब मधील लोखंड देखील बाहेर आलेले दिसून येत आहे. हा सर्व प्रकार नगरपरिषद प्रशासनाच्या समोर सुरू असून नगरपरिषद प्रशासनाकडून या अनधिकृत बांधकामांना अभय मिळत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.







