। नवीन पनवेल । वार्ताहर ।
मतदार याद्या अधिकाधिक त्रुटीरहीत करण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक करण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार खारघरमध्ये सुरू करण्यात आली आहे. यासाठी 87 बीएलओ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मतदार यादीतील बहुतांश मतदारांचा पत्ता चुकीचा असल्यामुळे या कर्मचार्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याची मोहीम निवडणूक आयोगाने 1 ऑगस्टपासून सुरू केली आहे. या उपक्रमामुळे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक केल्यामुळे एकापेक्षा जास्त मतदारसंघात नाव नोंदवलेल्या मतदारांना शोधून काढणे सोपे होणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठा नोड असलेल्या खारघरमध्येदेखील सध्या ही मोहीम सुरू आहे. यासाठी 87 बीएलओ कर्मचार्यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. मात्र, दीड लाख मतदार असलेल्या या विभागातील बहुतांश मतदारांचा घराचा पत्ता चुकीचा आहे; तर अनेक मतदारांनी खालची आळी, वरची आळी असे नमूद केले आहे. तर बहुतांश मतदार हे दिलेल्या पत्त्यावर राहत नसून काही मतदार आधारकार्ड महत्त्वाचे दास्तावेज असल्यामुळे ते संलग्न करण्यासाठी नकार देत असल्याने कर्मचार्यांची चांगलीच दमछाक झाली आहे.
मतदार यादीतील नावे दुरुस्तीची संधी
खारघर परिसरातील मतदार याद्यांत सावळागोंधळ आहे. नावे एका प्रभागात आणि मतदान दुसर्या प्रभागात आहे. मतदार यादी सुधारणाविषयी निवडणूक विभागात काम करणार्या अधिकार्यांशी विचारणा केली असता, नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी नवीन मतदार नोंदणी कामे सुरू होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी तसेच राजकीय व्यक्तीने पत्र देऊन मागणी केल्यास यादी दुरुस्त केली जाऊ शकते.
खारघर परिसरात बीएलओ म्हणून पालिकेचे कर्मचारी काम करीत आहे. त्यांचे दैनंदिन काम सांभाळून आधार कार्ड लिंकची कामे करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.
– विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल