महापालिकेची आरोग्य यंत्रणा रडारवर

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल महापालिकेच्या कामोठे प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोना चाचणीचा खोटा अहवाल तयार होत असल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमधून आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला आहे. तसेच महापालिकेच्या कार्यकक्षेतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

महापालिका क्षेत्रात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कोरोना कालावधीत आरोग्य केंद्रातील वैद्यकीय चमूने सामाजिक जबाबदारीने काम केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला चांगले यश मिळाले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेविषयी आदर निर्माण झाला असताना कामोठे प्राथमिक आरोग्य केंद्रात यंत्रणेवर टीकेची झोड उठली आहे.

कामोठेतील कोरोना रुग्णांच्या संशयास्पद माहितीमुळे माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी कामोठे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सखोल चौकशीची मागणी केली होती. डॉ. अमेय राठोड यांनी केलेल्या चौकशीअंती आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध देणारी व्यक्ती यांच्याविरोधात कोरोनाचा खोटा अहवाल सादर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाली आहे.

कोरोनामुळे अनेक संसार उदध्वस्त झाले आहेत. याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार धक्कादायक आहे. महापालिकेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची सखोल चौकशी झाली पाहिजे.

अमोल शितोळे,
अध्यक्ष, शेकाप कामोठे विभाग

कामोठे प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोनाचा खोटा अहवाल देण्याचा प्रकार घडल्याचा प्रकार धक्कादायक आहे. वैद्यकीय कर्मचारी व स्वच्छतादूतांनी कोरोनाच्या लाटेत नागरिकांच्या जीविताची काळजी घेतली. मात्र, काही लोकांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे.

रंजना सडोलीकर
सिटीझन्स युनिटी फोरम, कामोठे
Exit mobile version