। माथेरान । वार्ताहर ।
मागील दोन वर्षांपासून इथे एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. दस्तुरी नाक्यापासून ते पांडे रोडवरील क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. परंतु, लावण्यात येत असलेले ब्लॉक कमकुवत असल्याने त्यावर ठेकेदाराने ग्रीट अंथरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घोड्यांची विष्ठा आणि ग्रीटच्या धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे, त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांनासुद्धा या धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत अनेकदा नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी वर्गाला सूचित केल्यावर नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी एमएमआरडीएच्या संबंधित ठेकेदारांमार्फत रस्ते साफ करण्याऐवजी नगरपरिषदेच्या ठेका पद्धतीने असणार्या कामगारांना नगरपरिषदेचे अधिकारी राबवून घेत आहेत. एमएमआरडीएच्या ठेकेदाराने रस्त्याला लावलेले कच्च्या स्वरूपाचे ब्लॉक जे एक ते दोन वर्षात डबघाईला येणार आहेत, तेच क्ले पेव्हर ब्लॉक लपविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रीट अंथरून ठेवली आहे. त्यामुळे या रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत ब्लॉकवरील ग्रीटची साफसफाई त्याच ठेकेदाराने करणे अनिवार्य आहे. रस्त्यावरील ग्रीट काढण्याची जबाबदारी एमएमआरडीए ठेकेदाराची असताना नगरपरिषदेच्या कामगारांना का राबविण्यात येत आहे, त्या ठेकेदाराकडून ह्या कामगारांच्या रोजाची रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.