फॉग कॅननवाहनाच्या माध्यमातून पाणी फवारणी
| पनवेल | प्रतिनिधी |
वाढत्या हवा प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महानगरपालिके मार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये तपासणी, कारवाई आणि यंत्रणांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. या दरम्यान पालिकेकडून प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना एकूण 169 नोटिसा बजावल्या आहेत. तसेच खारघर, तळोजा, कामोठे-कळंबोली व पनवेल येथे चार फॉग कॅनन या वाहनांद्वारे दररोज 50 किमीपर्यंत तुषार फवारणी करून हवेतील धूळ नियंत्रण केले जात आहे.
पनवेल पालिकेने न्यायालयीन निर्देश व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रणाचे उपक्रम अधिक गतीमान केले आहेत. खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा व पनवेल या प्रभागांमध्ये उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून, बांधकाम व्यावसायिकांकडून धूळ नियंत्रणासंबंधी शासन नियमांचे पालन होते का, याची खातरजमा करण्यात येत आहे. नुकतीच कामोठे आणि खारघर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध बांधकाम स्थळांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान उप आयुक्त स्वरूप खारगे यांनी हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या 15 मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बांधकाम स्थळांवरील उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी केली. या दरम्यान, महापालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना एकूण 169 नोटिसा बजावल्या आहेत.
प्रभाग-नोटीस संख्या
प्रभाग समिती ‘अ' (खारघर)-19
नावडे उपविभाग- 38
प्रभाग समिती ‘ब' (कळंबोली)- 35
प्रभाग समिती ‘क' (कामोठे)- 19
प्रभाग समिती ‘ड' (पनवेल)- 58
एकुण- 169
हवा प्रदूषण नियंत्रण समिती सक्रिय
प्रत्येक प्रभागात स्थापन करण्यात आलेल्या समित्या नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकामांवर थेट कारवाई करत असून त्यांचा अहवाल आयुक्तांना सादर केला जात आहे. तसेच, हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आयुक्त चितळे यांच्या निर्देशानूसार खारघर, तळोजा, कामोठे-कळंबोली व पनवेल येथे चार फॉग कॅनन या वाहनांद्वारे दररोज 50 किमीपर्यंत तुषार फवारणी करून हवेतील धूळ नियंत्रण केले जात आहे. या गाड्यांवर जीपीएस ट्रँकींग सिस्टीमही बसविण्यात आली आहे.
आधुनिक मॉनिटरिंग सिस्टीम
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा एमआयडीसी भागात, कामोठे जव्हार इंडस्ट्रीयल व पनवेल इंडस्ट्रीयल भागात विविध कंपन्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे पनवेल शहरातील निवासी भागामधील हवेतील विविध घटकांची पातळी आणि हवामान घटकांचे निरीक्षण/मोजमाप करून नागरिकांना अचूक माहिती देण्यासाठी मंकी पॉइंट, उत्सव चौक, नाका, कळंबोली प्रवेशद्वार, कामोठे पोलीस स्टेशन, संताजी महाराज जगनाडे चौक व वडाळे तलाव अशा 7 ठिकाणी रिअल टाईम अम्बिएंट एअर क्वालिटी डस्ट मॉनिटर ॲण्ड मेट्रॉलॉजिकल पॅरामिटरर्स स्थापित करण्यात आले आहेत. सध्या कोपरागाव, खारघर राणी लक्ष्मीबाई चौक, नावडे लेबर नाका, कळंबोली हॉस्पिटल समोर, कामोठे प्रवेशद्वार अशा 5 ठिकाणी एअर प्युरिफिकेशन सिस्टीम कार्यरत आहेत. तर, आणखी 5 ठकाणी एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
