माथेरान पर्यटनस्थळाला पर्यटकांची पसंती
| माथेरान | वार्ताहर |
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रदूषणमुक्त थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळाला पर्यटकांनी पहिली पसंती दिली असून, यावर्षीच्या दिवाळी हंगामात माथेरान नगरपालिकेला प्रवासी कराच्या माध्यमातून विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. 22 ऑक्टो. ते 10 नोव्हें. या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माथेरानला हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून, प्रवासी करातून कोट्यवधींचे उत्पन्न माथेरान नगरपालिकेला प्राप्त झाले आहे.
या वर्षीच्या दिवाळी हंगामात माथेरानमध्ये जवळ जवळ 86 हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली आहे. यामुळे येथे प्रवासी कराच्या माध्यमातून नगरपालिकेच्या तिजोरीत चार कोटींपेक्षाही अधिक रकमेची भर पडली आहे. याकरिता माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे (शिंदे) यांनी पालिकेकडून प्रवासी कर ठेका डिजिटल प्रणालीद्वारे चालविण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरला असल्याचे सर्व स्थरातून बोलले जात असून, फक्त पंधरा ते वीस दिवसांत पालिकेला मिळालेल्या एवढ्या मोठ्या उत्पन्नाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रवासी कर डिजिटल प्रणालीद्वारे म्हणजेच मशीनद्वारे पावती सुरू केल्यामुळे अगदी सोयीचे आणि सोपे काम झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होत नसून, सर्व आकडेवारी आणि हिशोब अगदी योग्य पद्धतीने मिळतो. आणि आत्ता लवकरच पालिकेकडून कॅशलेस प्रवासी कर सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.
यापूर्वी प्रवासी कराचा ठेका टेंडर प्रक्रियेद्वारे दिला जात असे, त्यामुळे दिवसाला किती प्रवासी आले हे फक्त त्या ठेकेदारालाच माहिती असायचे. यावर्षी पहिल्यांदाच माथेरान नगरपालिकेकडून इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे माथेरान पर्यटनस्थळी दिवसेंदिवस पर्यटक संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.