जुन्या पेन्शन योजनेसाठी मनपा, नपा कर्मचारी आक्रमक

| उरण | वार्ताहर |
जुन्या पेन्शन राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांचे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. या मागणीसाठी दि.14 मार्चला राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात महाराष्ट्रातील 28 महानगरपालिका 369 नगरपालिका, नगरपंचायतीमधील कर्मचारी सहभागी होणार आहेत. या संपाबाबत चर्चा करण्यासाठी पिंपरी चिंचवड येथे आचार्य अत्रे सभागृह येथे महाराष्ट्रातील विविध कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा मुंबई मनपा कामगार अध्यक्ष अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्याचे आयोजक बबनराव झिंजुर्डे, नगरपंचायत नगर परिषद व संवर्ग कर्मचारी, समन्वय समितीचे राज्याचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, गणेश शिंगे, अ‍ॅड. सुरेश ठाकूर, संतोष पवार, अ‍ॅड. सुनील वाळूजकर, डी.पी. शिंदे, के.के. आंधळे, अनिल जाधव, प्रा. ए.बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.

या मेळाव्यामध्ये कराड यांनी सन 2015 पासून नवीन झालेल्या 149 नगरपंचायतीमधील कर्मचार्‍यांचे समावेशन अद्यापपर्यंत झालेले नाही. तसेच सफाई कर्मचार्‍यांचा आकृतीबंध मंजूर केलेला नाही. त्यामुळे या नवीन नगरपंचायतीमधील सर्व कर्मचार्‍यांचे विना शर्त, विना अट समावेशन करावे व सफाई कर्मचार्‍यांची आकृतीबंधामध्ये पदे मंजूर करून त्यांचेही समावेशन त्वरित करावे मागण्या केल्या.

मेळाव्यामध्ये खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, आमदार उमा खापरे यांनीही समक्ष भेट देऊन कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नासंबंधी निश्‍चितपणाने शासनाकडून न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली जाईल, असे आश्‍वासन यावेळी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध संघटनेच्या माध्यमातून 14 मार्च रोजी होणार्‍या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये 17 लाख राज्य शासकीय कर्मचारी व महानगरपालिका नगरपंचायतीमधील चार लाख कर्मचारी सामील होण्याचा निर्णय बबनराव झिजुर्डे, डॉ. डी.एल. कराड, अ‍ॅड. सुनील वाळुजकर, संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक संतोष पवार यांनी जाहीर केला.

Exit mobile version