| पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम 2022 मधील कलम 36 ‘क’नुसार सर्व दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची प्रत्येक आस्थापनेवर देवनागरी लिपीतील नामफलक असणे बंधनकारक आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने कार्यक्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल चारही प्रभागांमधील जवळपास 1,163 दुकाने तसेच आस्थापनांवर नोटिसा बजावल्या आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक दुकाने व आस्थापनांवरील नामफलक फक्त इंग्रजीत व अन्य भाषेत आहेत. काही फलकांवर नावे मराठी भाषेत लिहिलेली जरी असली तरीही ती औपचारिकता म्हणून कोपऱ्यात लहान अक्षरात लिहिलेली आहेत. नियमाप्रमाणे दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक हे ठळक मराठी (देवनागरी) लिपीत तर असावाच त्याचप्रमाणे इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान नसावा, असे नमूद आहे. त्यामुळे दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यात टाळाटाळ करणाऱ्या दुकानांवर महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. याच अनुषंगाने पनवेल महापालिकेने प्रभाग अ, ब, क, ड मधील जवळपास 1,163 दुकाने तसेच आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांनी अजूनही अमराठी पाट्या बदलल्या नाहीत, त्यांचे प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
अमराठी नामफलक लावणाऱ्या आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार बहुतांश ठिकाणी मराठीमध्ये दुकानांचा नामफलक बनवले जात आहेत. तसेच, अमराठी पाट्या असलेल्या आस्थापनांचे सर्वेक्षण सुरु आहे.
गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका