अल्पवयीन मुलाने घातला डोक्यात दगड
। पुणे । प्रतिनिधी ।
वाघोली येथे किरकोळ वादातून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नशेत असलेल्या एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हटल्याचा रागात अल्पवयीन मुलाने त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेतील मृत व्यक्ती आणि आरोपी मुलगा वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरात राहतात. बुधवारी (दि.04) दुपारी दीडच्या सुमारास दोघेही मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. मयत राजू लोहार यांनी आरोपीला उद्देशून ‘तुझा बाप टकल्या आहे’ असे म्हटले. याचाच राग आल्याने आरोपी अल्पवयीन तरुणाने राजू लोहार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भला मोठा दगड उचलून मारला. यात राजू लोहार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. तसेच, याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.