। जेजुरी । प्रतिनिधी ।
माळशिरस येथे प्रेयसीच्या पतीचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या आरोपीस जेजुरी पोलिसांनी अटक केली. सुशांत संदीप मापारी रा. माळशिरस असे त्याचे नाव आहे. तसेच सुशांतसह त्याच्या अल्पवयीन साथीदारासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील दीपक जगताप याचा एक महिन्यापूर्वी पायल कांबळे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी याने दीपक यांना मोबाईलवर फोन करून, पायलबरोबर लग्न करायचे होते. तुम्ही लग्न केले. तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. शनिवारी (दि. 13) सुशांत याने दीपकला माळशिरस येथील रामकाठी शिवारात बोलावून घेतले. तेथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर सुशांत पळून गेला. रविवारी (दि. 14) खुनाची घटना उघडकीस आली. आरोपी सुशांतला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली होती. सोमवारी (दि. 15) आरोपी यवत परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या पथकाने यवत परिसरातील शेतात सुशांतला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले.






