उरण पोलिसांनी अवघ्या काहीतासातच लावला प्रकरणाचा छडा
। चिरनेर । दत्तात्रेय म्हात्रे ।
उरण तालुक्यातील करंजा द्रोणागिरी हायस्कूलच्या पाठीमागे माळरान असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी काल 29 जुलै रोजी एका अज्ञात इसमाचा दोरीने हातपाय बांधलेला मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे चाणजे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण झाली होती. हा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्यामुळे या व्यक्तीचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
उरण पोलिसांना या तपासात सर्वप्रथम मृतदेहाची ओळख पटवली. त्यांनतर अवघ्या काही तासातच शिताफीने आरोपींनाअटक केली आहे. खून झालेल्या मयत इसमाचे नाव किरण सदानंद कडू (55) रा. बेलापुर, शाहबाज मुळगाव नवघर -उरण असे आहे. ही व्यक्ती बेरोजगार तरूणांकडून नोकरी लावण्याच्या निमित्ताने पैसे उकळून फसवणूक करण्याचा धंदा करीत होती. त्या इसमावर ठाणे आणि मुंबईमध्ये आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल होते.
गुन्ह्यातील मयत इसम किरण कडू याने करंजा गावातील बेरोजगार तरूणांकडून नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून जवळजवळ 19 ते 20 लाख रूपये एवढी मोठी रक्कम उकळली होती. मात्र अनेक महिने उलटून गेल्यानंतरही या तरूणांना नोकरी मिळत नसल्याने त्यांनी आपले पैसे परत मिळविण्यासाठी किरणकडे तगादा लावला होता. तो पैसे देत नसल्यामुळे संतापलेल्या चार तरूणांनी रविवारी किरण राहत असलेल्या नवी मुंबईतील सीबीडी – बेलापूर जवळील शाहबाज येथील घरी जाऊन त्याच्याशर गोड बोलत आपल्या स्विफ्ट कारमधून करंजा, द्रोणागिरी हायस्कूलच्या पाठीमागील द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्या जवळ आणले. तेथे आणल्यानंतर ज्या बेरोजगारांचे पैसे बुडविले होते, त्यांच्या नातेवाईकांना तिथे बोलविण्यात आले. यावेळी झालेल्या वादात या सर्वांनी किरणला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यानंतर तो शुद्धीवर येवून पळून जाऊ नये म्हणून त्याचे हातपाय बांधून ठेवण्यात आले. काही वेळानंतर तो मरण पावला.
ही घटना तेथील गुरख्याने पाहिली होती. त्यांनी या बाबतची माहिती करंजा गावातील काही लोकांना दिल्यानंतर काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवित अवघ्या काही तासातच मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी खूनाची कबूली दिली आणि या खूनात कोणाचा सहभाग होता, त्यांचीही माहिती दिली. उरण पोलिसांनी या प्रकरणी साहिल श्याम कोळी (29) रा. कोंढरीपाडा, नयन मनोहर कोळी (19)रा. कोंढरीपाडा, हिमांशु कैलास बंदरे (25) रा. कासवलेपाडा, यश प्रेमानंद कोळी (23) रा. कासवलेपाडा, विघ्नेश परशुराम कोळी (30) रा.कोंढरीपाडा, राजेश बाबू कोळ (50) रा. पनवेल कोळीवाडा, अभिजित हरिश्चंद्र चौगुले (27) रा.डोलघर ता – पनवेल यांना अटक केली आहे.
या खून प्रकरणात बंदर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सावंत, उरणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र बुधवंत यांच्यासह त्यांच्या पोलिस पथकाने योग्य त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवीत मोठ्या शिताफीने तपास करीत वरील गुन्ह्याचा तपास करून आरोपींना तात्काळ जेरबंद केले आहे.