बेपत्ता झालेल्या व्यक्‍तीची हत्‍या; तीन जणांना अटक

| सिंधुदुर्ग | वृत्तसंस्था |

दोडामार्ग तालुक्यातील एक व्यक्‍ती गेल्‍या दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाली हाेती. मात्र पाेलिस तपासात या विवाहित तरूणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. उमेश बाळू फाले (32) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याच्या खुनाप्रकरणी संशयित राजाराम काशीराम गवस (34), सचिन महादेव बांदेकर (32) व अनिकेत आनंद नाईक (25) सर्व रा. उसप या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश फालेला आपल्या पत्नीसाेबत राजाराम गवसचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे तो राजारामला नेहमी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता. त्यामुळे राजारामच्या मनात राग होता. त्याला कायमची अद्दल घडवायची असे राजाराम मनात ठरवून होता. अखेर त्याने मित्र अनिकेत नाईक व सचिन बांदेकर या दोघांच्या मदतीने उमेशला दोडामार्ग व गोवा राज्याच्या सीमेवरील तिलारी धरणाच्या कालव्याजवळ बोलावले. तेथे त्याला दारू पाजली. मद्यधुंद झालेल्या उमेशला अनिकेत, सचिन व राजाराम यांनी मारहाण करून त्यांनतर दोरीने त्याचा गळा आवळला. उमेशच्या डोक्यावर दगड घातला आणि त्याला कालव्याच्या पाण्यात फेकून दिले. उमेश घरी परतला नसल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. उमेशचा खून झाल्याची गुप्त माहिती खबऱ्यांमार्फत दोडामार्ग पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र मळगावकर, समीर सुतार आदींनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली व अखेर संशयितांची नावे पुढे आली. त्यानंतर त्या तिघांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत.

Exit mobile version