। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील एका 50 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.25) रात्री किहीम येथे घडली. मजुरीचे राहिले पैसे मागितल्याचा राग धरून तिच्या डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने वार केला. त्यामध्येच तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कमलीबाई किसन पवार (50) रा. गोंधळपाडा असे या मृत महिलेचे नाव आहे. किहीम येथील मयेकर यांच्या घराचे बांधकाम चालू होते. त्याठिकाणी ही महिला काम करीत होती. तिने केलेल्या कामाचे राहिलेले पैसे मिळावे यासाठी ती महिला ठेकेदार मल्लीकार्जुन यांना भेटली. गुरुवारी (दि.25) रात्री नऊ वाजण्याच्या अगोदर पैसे देणे, घेण्यावरून शाब्दिक वाद झाला. मल्लीकार्जुन याने रागाच्या भरात तेथील कोणत्यातरी हत्याराने तिच्या डोक्यात वार केला. त्यामध्ये ती बेशुद्ध झाली. तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला अगोदरच मृत असल्याचे घोषित केले. याप्रकरणी व्यंकटेश किसन पवार यांनी मल्लिकार्जुन यांच्याविरोधात तक्रार देत त्यानेच कमलाबाईचा खून केल्याची फिर्याद मांडवा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.