थरारक! कर्जत बोरगाव येथे तरुणाचा खून

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव गावातील एका 38 वर्षीय शेतकरी तरुणाचा शनिवार, 18 सप्टेंबर रोजी सकाळी खून झाला आहे. रक्तरंजित इतिहास असलेल्या बोरगावमधील 1991 नंतरचा हा पहिलाच खून असून, त्याआधी सातत्याने या गावात खुनाच्या घटना घडत होत्या.

जगदीश अंकुश पाटील हा 38 वर्षीय तरुण होमगार्डची नोकरी सोडून गेली सहा वर्षे म्हशी आणि गायी यांच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय करीत होता. होमगार्डची नोकरी सोडल्यानंतर जगदीश पाटील हा तरुण व्यसनाच्या आहारी गेला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबाने खालापूर तालुक्यातील चौक येथे नशामुक्ती केंद्रात उपचार केल्यावर व्यसनापासून दूर गेलेल्या या तरुणाने आपल्या कुटुंबाची गुरे आणि गायी-म्हशी यांचे पालन करण्यास सुरुवात केली. गायी, म्हशी यांचा बेडा बोरगाव गावापासून पोश्री नदीच्या पलीकडे ओलमण रस्त्यावर असून, दररोज सकाळी सहापूर्वी जगदीश हा तेथे गायी-म्हशी यांचे दूध काढण्यासाठी पोहचत असे.गावापासून लांब असल्याने फार कोणाची वहिवाट त्या भागात नाही.

आज 18 सप्टेंबर रोजी जगदीश अंकुश पाटील हा पहाटे साडेपाच वाजता घरातून तबेला (बेड्यावर) जाण्यास निघाला होता. त्यानंतर शेताकडे गेलेला जगदीशचा काका सुरेश सीताराम पाटील यांनी साडेसहा वाजता जगदीश अंकुश पाटील यांना बेड्याबाहेर उबडे पडलेले पाहिले. त्यावेळी जगदीश पाटील यांच्या तोंडातून रक्त तसेच फेस आलेला होता. त्याचवेळी त्यांच्या गळ्याला काहीतरी फास आवळल्याच्या खुना दिसत होत्या, तसेच शरीरावर काही जखमादेखील होत्या. त्यांना कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी नेले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी साडे सातच्या दरम्यान जगदीश यांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले.

त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात जगदीश अंकुश पाटील यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत जगदीश यांचा लहान भाऊ चिनू पाटील यांनी त्याबाबत पोलिसांना फिर्याद दिली असून, गळा आवळून खून झाला असल्याची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बोरगाव मध्ये तरुणाचा खून झाल्याची खबर मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर तसेच अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी घटनास्थळी पाहणी करून मयताचे नातेवाईक आणि गावातील अन्य लोकांसोबत चर्चा केली असून, खुन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जगदीश अंकुश पाटील यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Exit mobile version