| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कौटुंबिक वादातून संतापलेल्या एका कॅबचालकाने स्वतःच्या पत्नी, सासू, मेहुणे, मेहुणी आणि सात वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये उघडकीस आली आहे. इंदुशेखर असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दोन दिवसांत सात जणांची हत्या केल्याची कबुली त्याने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पत्नी सुनीता हिचे माहेरच्या कुटुंबियांशी असलेले जवळचे संबंध आणि वारंवार माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. याच रागातून आरोपीने हत्येचे नियोजन केल्याचा संशय आहे. प्रथम पत्नीची हत्या केल्यानंतर तिचे भाऊ शिवकुमार आणि शंकर यांना पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी दिव्या, नलिनी, सासू रूपवती आणि सात वर्षांचा पुनीत यांनाही संपवल्याचा आरोप आहे.
हत्येनंतर रक्ताचे डाग रसायनांच्या साहाय्याने पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला दगडी पाटा-वरवंटा आणि कार जप्त केली आहे. नंदी हिल्स परिसरात चार तासांच्या शोधमोहिमेनंतर सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह सापडला असून, अन्य सहा मृतदेहांचा शोध सुरू आहे. कुटुंबातील सदस्य बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या सामूहिक हत्याकांडाचा उलगडा झाला. आरोपीला अन्य कोणाची मदत होती का, याचाही पोलीस तपास करीत आहेत.
एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या
