बसस्थानकामध्येच टाकला मृतदेह; सासू-सासऱ्याला अटक
। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धावत्या एसटी बसमध्ये सासू आणि सासर्याने जावयाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बसस्थानकामध्येच टाकून आरोपींनी पळ काढला होता. मात्र, हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले असून पोलिसांनी सासू आणि सासर्याला अटक केली आहे. या घटनेने कोल्हापूरमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी कोल्हापूरच्या बसस्थानक आवारातील एस.टी. प्रोव्हिजन या दुकानाच्या कट्ट्यावर एक अनोळखी तरूण बेशुद्धावस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळताच शाहूपूरी पोलीस स्टेशनमधील अधिकारी तेथे दाखल झाले आणि त्यांनी तपासणी केली असता तो तरूण मृत असल्याचे स्पष्ट झाले. मृत व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्या शर्टाच्या खिशात एक डायरी व किल्ली सापडली. त्यावरून मृताचे नाव संदिप रामगोंडा शिरगांवे (रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असल्याचे समजले. डायरीत त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबरही होता. पोलिसांनी तिला संदीपबद्दल माहिदी देऊन त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
दरम्यान मृतदेह मिळालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आजूबाजूला चौकशी केले असता बुधवारी (दि. 25) रात्रीच्या सुमारास अनोळखी एक महिला व एक पुरुष असे दोन व्यक्तीनी मृतदेह बसस्थानक परीसरात उचलून आणून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता संदिप शिरगांवे हा दारुचा व्यसनी असून तो त्याचे पत्नीमुलास दारु पिऊन त्रास देत असल्याने त्याची पत्नी व मुले त्याच्यापासून वेगळे राहत असल्याचे पोलिसांना समझले. तर, संदीपला दुकानापाशी ठेवणारे त्याचे सासू-सासरे असल्याचे समोर आले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले होते. अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी सासू गौरा हनमंतआप्पा काळे व सासरा हनमंतआप्पा काळे यांना ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता जावई दारू पिऊन मुलीला प्रचंड त्रास देत होता. अखेर या छळाला वैतागून सासू-सासऱ्यांनी त्याची समजूत काढू असे सांगत कोल्हापूरला जाण्याचा बहाण्याने बसमध्ये बसवले. यावेळी पुन्हा एकदा बसमध्येच जावई आणि सासू-सासर्यांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर प्रवासादरम्यान त्याची गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह एसटी स्टँडवर ठेवून दिल्याचे त्यांनी कबूल केले. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.