‌‘मर्फी’ ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ

सात वर्षांत चार गुन्हे उघडकीस; 17 गुन्ह्यांसाठी मार्गदर्शन

| अलिबाग | प्रमोद जाधव |

चोरी, घरफोडी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यामध्ये रायगड पोलीस दलातील श्वान पथकामधील मर्फी श्वानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पेण, महाड व मुरुड येथील अनेक गुन्हे त्याच्या प्रयत्नाने उघडकीस आणून गुन्हेगारांना पकडून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून तो ओळखला जात आहे.

रायगड पोलीस दलातील श्वान पथकामध्ये मर्फी 2017 मध्ये दाखल झाला. टेकनपूर येथे त्याचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 2018 पासून तो पोलीस दलात कार्यरत आहे. घरफोड्या, खून आदी गुन्ह्यांतील आरोपींना पकडून देणे आणि मार्गदर्शन करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा ठरला आहे. पेण तालुक्यात खून झाल्याचा गुन्हा दादर सागरी पोलीस ठाण्यामध्ये 6 मे 2020 मध्ये दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी रायगड पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. मृताच्या अंगावर पडलेल्या कोयत्याच्या वासावरून मर्फीने खुन्याचा शोध लावला. मर्फीला कोयत्याचा वास देण्यात आला. त्या वासावर मर्फी एक दुमजली घराकडे येऊन भुंकू लागला. ते घर पाटील नामक व्यक्तीचे असल्याचे समजले. त्यानुसार पडताळणी करून पोलिसांनी तेथील आरोपीला ताब्यात घेतले आहे.

रोह्यामध्येदेखील खून झाला होता. त्या परिसरात एक कुऱ्हाड पोलिसांना दिसून आली. कुऱ्हाडीच्या दांडक्याच्या वासावरून मर्फीने खून करणाऱ्या आरोपीचा शोध काही तासातच लावला. अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मर्फीला यश आले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे चोरी, घरफोडीबरोबरच खून करणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचता आले. सात वर्षांत मर्फीने चार गुन्हे उघडकीस आणले असून, 17 गुन्ह्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

Exit mobile version