। आगरदांडा । प्रतिनिधी ।
सुट्टीचा शेवटचा हंगाम असल्याने मागील दोन दिवसांपासून मुरुड समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. हॉटेल व लॉजिंगमध्ये तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने समुद्रकिनारी रस्त्यावर ट्रॅफिक पहावयास मिळाली. उंट स्वारी व घोडा गाडीचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक दिसत होते.
सलग सुट्ट्यांमुळे राज्याभरातून अनेक पर्यटकांनी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी अधिक पसंती दिली. स्वतःची वाहने घेऊन आलेल्या पर्यटकांची बेसुमार गर्दी जंजिरा किल्ला पहावयास मिळाली. राजपुरी येथे गाड्या पार्क करुन जेट्टीवरुन शिडाच्या होड्यांद्वारे किल्ल्याकडे पर्यटकांना नेले जाते. रविवारी सकाळपासूनच मुरुड समुद्रकिनारी सुट्टी साजरी करण्यासाठी असंख्य पर्यटक मुंबई, पुणे, ठाणे व इतर शहरांतून आणि जिल्ह्याच्या विविध भागातून कुटुंबासह मोठ्या संख्येने समुद्रकिनारी दाखल झाले आहेत.