उधाणामुळे मुरूड किनारा उजाड

सुरूची झाडे उन्मळून पडल्याने किनार्‍याची धूप

| मुरूड । वार्ताहर ।

मुरूड समुद्रकिनारी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते, मात्र उधाणामुळे येथील किनार्‍याची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. सुरूची झाडे उन्मळून पडल्याने वने उजाड झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. लाटांच्या मार्‍यामुळे नगर परिषदेने लावलेले दिवे, तसेच बसण्यासाठी बांधलेले सिमेंटच्या कट्ट्यांचीही मोडतोड झाली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारपट्टीचे लवकरात लवकर सुशोभिकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

कृषी योजनेंतर्गत 1980 मध्ये सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र भरतीचे पाणी घुसल्याने वनाची बांधबंदिस्ती नष्ट झाल्याने सुरूची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारकडून एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ म्हणत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे, मात्र दुसरीकडे 40 वर्षांपूर्वीची वृक्षसंपदा केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे नष्ट होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

कोविडमुळे दोन वर्षे परिसरातील व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. आता कुठे पर्यटनाचा हंगाम बहरू लागला आहे. मात्र किनारी भागात कचर्‍याचे ढीग, बाकड्यांची दुरवस्था, बांधबंदिस्तीची प्रचंड प्रमाणात झालेली धूप आणि त्यामुळे नष्ट होत असलेली सुरूची वने आदी पाहिल्यावर पर्यटकांचा हिरमोड होतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारपट्टीलगत सुशोभीकरण व सुरूच्या वनांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, तरच पर्यटकांचा ओघ वाढेल, असे स्थानिक व्यावसायिकांकडून बोलले जात आहे.

सुरूच्या झाडांचे संवर्धन आवश्यक
मुरूडमध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारा सुशोभीकरण व सुरूच्या झाडांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. मेरिटाईम बोर्डाचा यासाठी सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे, तरच व्यवसायात वृद्धी येईल, असे मत स्थानिक व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आले

Exit mobile version