मुरुड समुद्रकिनारा पर्यटकांनी हाऊसफुल्ल

हॉटेल व्यवसाय तेजीत, वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर प्रथमच मुरूड समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली. दिवाळीची सुट्टी असल्याने मागील दोन दिवसांपासून समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. हॉटेल व लॉजिंगमध्ये तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे.वाहनांची संख्या वाढल्याने समुद्रकिनारी रस्त्यावर ट्रॅफिक पहावयास मिळाली. वाळूवरच्या गाड्या व घोडागाडीचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक दिसत होते. सलग सुट्ट्यांमुळे मुरुडमध्ये मुंबई, पुणे, ठाणे व राज्यातील अन्य भागांतून कुटुंबासह मोठ्या संख्येने पर्यटक मागील दोन दिवसांपासून दाखल झाले आहेत. राजपुरी येथे गाड्या पार्क करुन जेट्टीवरुन शिडाच्या होड्यांद्वारे जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जाणार्‍यांनी मोठी गर्दी केली होती. समुद्र स्नानाबरोबरच पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्स बाइक व बनाना रायडिंगचाही आनंद घेतला. भरपूर गर्दी व पर्यटकांच्या येण्याने समुद्रकिनारे गजबजून गेले होते. सर्व लॉज फुल्ल असल्याने पर्यटकांना काही ठिकाणी राहण्याची समस्याही उद्भवली. मुरुड तालुक्यातील काशीद-बीच, दत्तमंदिर, गांरबी, जंजिरा किल्ला, ईदगाह हा परिसर आल्हाददायक, शांत, रमणीय आहे. मुंबईपासून 200 किलोमीटर आत असल्याने पर्यटकांची पसंती वाढती आहे.

Exit mobile version