मुरुड किनारी पर्यटकांचे उधाण

तालुक्यात हजारो वाहने दाखल; जंजिरा पाहण्यासाठी तुफान गर्दी

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

सलग दोन दिवस जोडून आलेली सुट्टी आणि पर्यटनाचा हंगाम सुरु झाल्याने पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी कोकण समुद्रकिनारपट्टीत आल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी पर्यटन आता अधिक फुलणार आहे, अशी माहिती रविवारी मुरूड तालुक्यात ठिकठिकाणी फिरताना मिळत आहे.सुमारे एक हजार वाहने तालुक्यात दाखल झाली आहेत.

मुरूड तालुका हा पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध असल्याने शुक्रवार, शनिवार पासून मोठया संख्येने पर्यटक डेरेदाखल झालेले दिसून येत आहेत. काल रविवारी यामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे फिरताना जाणवले. मुरुडचा जंजिरा किल्ला पर्यटकांनी फुलून जाऊन हाऊसफुल्ल झाल्याचे रविवारी दुपारी राजपुरी जेट्टीवरून दिसत होते. राजपुरी जेट्टीवर वाहनांचे पार्किंग कमालीचे फुल्ल झाल्याने अनेक वाहने राजपुरी समुद्रकिनारी वाळूवर पार्क केल्याचे दिसून आले. खोरा बंदरात तर वाहनांची सुमारे अर्धा किलोमीटर रांग लागली होती. खोरा जेट्टी मुरूडपासून जवळ असल्याने पर्यटक येथे जातात. येथून जंजिर्‍यात जाण्यासाठी 3 ते 4 यांत्रिक लाँचमधून प्रवासी जलवाहतूक केली जाते, अशी माहिती एकदरा महादेव कोळी समाज अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी दिली. जंजिरा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठीच मांदियाळी आल्याचे आगरकर यांनी सांगितले.

राजपूरी येथील मच्छिमार धनंजय गिदी यांनी सांगितले की, खूप मोठ्या संख्येने सकाळपासून पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी रोहा, तळा, दिघी, श्रीवर्धन, मुरूड बाजूकडून आले असून, जागोजागी वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. पर्यटकांमुळे छोटे-मोठे व्यवसाय करणार्‍या दुकानांतून मोठी उर्जितावस्था आल्याचे दिसत आहे. मुरूड, काशीद, नांदगाव आदी बीचवरदेखील प्रचंड संख्येने पर्यटक समुद्रकिनारी उतरले असून, घोडेस्वारी, बनाना रायडिंग आणि विविध जलक्रीडा प्रकारातील आनंद घेताना दिसत आहेत. काशीद बीचवरून जाणार्‍या अलिबाग-मुरूड मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचे काशीद येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम यांनी सांगितले. काशीद येथे पार्किंग अपुरे पडते, असे अनेक वेळा दिसून येते.

मुरूड तालुक्यात एकट्या मुरूडकडे 500 पेक्षा अधिक पर्यटकांची वाहने आल्याची माहिती रविवारी दुपारी मुरूड नगरपरिषदेचे पोलीस ठाण्याजवळील टोल नाका कर्मचारी मितेश माळी आणि अविनाश अवघडे यांनी दिली. तर, काशीद बीचवरदेखील सुमारे 700 वाहने आल्याचे सूर्यकांत जंगम यांनी सांगितले. मुरूड बीचवरदेखील समुद्रात पर्यटक उपलब्ध बोटिंग, पॅराग्लायडिंग, घोडेस्वारी, सायकलिंग, समुद्रस्विमिंग आदींचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत होते. नांदगाव बीचवरदेखील पर्यटकांची मोठी वर्दळ असून, येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक देवस्थान दर्शनाचा लाभ अनेक पर्यटक भाविक घेत आहेत. मुरूड येथील दत्तदेवस्थानला पर्यटक भेट देताना दिसून आले.

रेवदंडा-साळाव पुलावरून सर्व वाहतूक बंद नाही

रेवदंडा-साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हा पूल एसटी बसेस किंवा पाच टनापेक्षा अधिक वजनी वाहनांच्या वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. 1 मेपासून या पुलावरून सर्व वाहतूक बंद केली जाणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर कोणीतरी पसरविले असून, अशी सर्व वाहतूक बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अलिबाग येथील कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले. सर्व वाहतूक बंद करण्याचे वृत्त निराधार असल्याचे श्री. सुखदवे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version