| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील जंजिरा किल्ला व इतर पर्यटन स्थळ पाहण्यासाठी वर्षाला लाखो पर्यटक राज्यभरातून आपली खासगी वाहने घेऊन येत असता. त्यामुळे मुरुड शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या पुर्वीपेक्षा दहा पट वाढली आहे. त्यामानाने पालिकेचे रस्ते अरुंद असल्याने शहरात पार्किंगची समस्या देखील मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. दरम्यान, शनिवार-रविवार व प्रजासत्ताक दिनाच्या सलगच्या सुट्ट्या आल्याने मुरूड शहर फुल्ल झाले असून वाहतूक कोंडीत अडकले आहे. त्यामुळे शहर परिसरातील पार्किंगसाठीची स्वतंत्र नियोजनाची गरज भासू लागली आहे.
मुरूड शहराला ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी येत असतात. परंतु, शहरातील अरूंद रस्ते आणि पार्किंगची समस्या असल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड कोंडी होते. त्यातच आताच्या तीन दिवसीय सलगच्या सुट्ट्यांमुळे मुरूडमधील लोकसंख्या चार पटीने वाढते. त्यामुळे येथील बाजारपेठ व मासळीमार्केट रस्ता वाहतुक कोंडीत सापडतो. त्यामुळे या सर्वांचे नियोजन कोणी करायचे? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.
या समस्येबाबत मुरुड नगरपरिषद नियोजन करून अंमलबजावणीसाठी पोलिसांना विनंती करते. दरम्यान, परिषदेने बाजारत वनवे केले, सम विषम तारखांना पाकिंगचे नियोजन केले. याबाबत नागराध्यक्षांच्या हस्ते त्या ठिकाणी फलक देखील लावण्यात आले. परंतु, परिस्थती जैसे थेच आहे. बाजारात वाहने चुकीच्या पद्धतीने लावली जातात. त्यामुळे रस्ते जाम होतात. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. परंतु, त्यासाठी पोलिसांकडे अतिरिक्त कर्मचारी नसल्याने ते नियोजन देखील फसले जात आहे.
पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे
मुरुड शहरातील रेस्टोरंट व हॉटेल व्यवसायिकांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनासांठी स्वतंत्र पार्कींग सुविधा करणे गरजेचे आहे. अन्यथा सुरक्षा रक्षक नेमून नियोजन करावे. दर रविवारी समुद्रकिनारी व बाजारातील रस्ते वन वे करण्यात यावेत. रहदारीच्या रस्त्यावरील दुकानदारांनी दुकानातील सामान रस्त्यावर लावू नये. याबाबतचे सर्व नियोजन नगरपरिषद व पोलिसांनी पुढाकार घेऊन करणे गरजेचे आहे.







