मुरूडला ऐन सिझनमध्ये मासळीचा तुटवडा

शेलबेलदेखील नाही; बाहेरचे बोंबील विक्रीस
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
पर्यटनाच्या ऐन सिझनमध्ये मुरुडच्या मार्केट मध्ये मासळीचा तुटवडा निर्माण झाला असून, रविवारीदेखील अशीच परिस्थिती दिसून येत होती. बाहेरगावचे बोंबील विक्रीस आलेले दिसून येत आहेत. मार्केटमध्ये जवळा, कोलंबी, शेलबेल, खेंगाटदेखील गेल्या आठवड्यापासून येत नसल्यामुळे स्थानिक खवय्ये आणि पर्यटकदेखील हिरमुसल्याचे दिसून येत आहे. रविवारी मुरूड मार्केटमध्ये बांगडा, थोडेसे बोंबील, छोट्या सुरमई आदी नेमकीच मासळी आढळून आली. पर्यटकांनी अखेर आपला मोर्चा सुकी मासळी खरेदीकडे वळविल्याचे दिसून येत होते. मुरूड समुद्रात सध्या मासळी किंवा कोलंबी मासळी मिळत नसल्यामुळे मासेमारी बंद असून, नौका किनार्‍यावर उभ्या आहेत. एकदरा येथील हनुमान मच्छिमार सह. सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी सांगितले की, समुद्राचे पाणी आता सफेद आणि निळे असल्याने मासळी किनार्‍याकडे येत नाही. गढूळ पाणी असल्यावरच कोलंबी मोठ्या प्रमाणात किनार्‍यावर येत असते. सध्या मुरूड मार्केट मध्ये अलिबाग-रेवदंडा येथील बोंबील विक्रीस येत असून, हे बोंबील बर्फातले आणि बेचव लागतात, असे खवय्ये सांगतात. समुद्रात घडणार्‍या विविध घडामोडी मुळे पारंपरिक मासेमारी सातत्याने संकटात सापडत असल्याने मच्छिमार हवालदिल झाल्याची माहिती पांडुरंग आगरकर यांनी दिली. ताजी मासळी खाण्यासाठी येणार्‍या पर्यटकांनादेखील या परिस्थितीमुळे वंचित राहावे लागत आहे.सभोवताली अरबी समुद्र असूनही मुरुडला मासळीचा तुटवडा पाहून पर्यटकांनादेखील धक्का बसत आहे.

Exit mobile version