सलग सुट्टीत मुरुड जंजिरा हाऊसफुल्ल

किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगा
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, नांदगाव व ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मुरुडशिवाय श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, रेवदंडा, आक्षी, किहीम आदींसह सर्वच ठिकाणे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली. सकाळी सात वाजल्यापासून पर्यटक राजपुरी जेटीवर व खोरा जेटीवर हजर झाले; परंतु जंजिरा किल्ला पुरातत्व विभाग सकाळी 9.30 शिवाय उघडत नाही. तिकीट घेईपर्यंत दहा वाजतात. नंतर बोटीतून किल्ल्यात जाणार तोपर्यंत कडक उन्हाने पारा चढतो व लहान मुले हैराण होतात. मे महिन्यात तरी किल्ला सकाळी आठ वाजता उघडण्याची विनंती पर्यटक करीत आहेत. राजपुरीच्या मुख्य जेटी भरतीमुळे वापरता येत नाही. शासनाचे कोटी रुपये फुकट गेलेत. सध्या बोटधारकांनी पर्यटकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने तिकीट घरासमोर जेटी बनवली आहे. त्यामुळे पर्यटकांना बोटीत बसणे सोपे जाते. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक उतरले असून, दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. पर्यटकांनी शनिवारी सायंकाळपासून गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू सर्व लॉज फुल्ल झाले आहेत. समुद्रकिनारी असणार्‍या प्रत्येक स्टॉलवर गर्दी पहावयास मिळत आहे. जंजिरा किल्ल्यावरसुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळाली. औरंगाबाद, लातूर, परभणी, मुंबई, कल्याण, डोंबिवली, विरार, दहिसर, ठाणे आदी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे हजर झाले आहेत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत असून, काही काळ वाहतूक कोंडीसुद्धा झाली; परंतु टॅ्रफिक हवालदार आपली भूमिका चोख बजावत असल्याने वाहतुकीस रस्ता मिळत होता. आज ढगाळ वातावरण असल्याने वातावरण चांगले होते. ढगाळ वातावरण असूनसुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने समुद्रकिनारी हजर झाले होते. हॉटेलमधील चविष्ट मासे खाण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचेसुद्धा दिसून आले. पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रत्येक घटकाला स्वयंरोजगार प्राप्त झाला होता. प्रत्येक तासाला वाहनांची वाढती संख्या व वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करताना मोठी समस्या उद्भवत होती. पर्यटकांमुळे आज मुख्य बाजारपेठेतसुद्धा गर्दी दिसून आली. विविध वस्तू खरेदीसाठी पर्यटक बाजारपेठेतसुद्धा आले होते. समुद्र स्नान, बोटिंग, उंट सफारी, बनाना रायडिंग आदींचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते.

Exit mobile version