रहिवासी इमारत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड पोलीस ठाण्याजवळ पोलिसांना राहण्याकरिता 27 खोल्या असून, त्या खोल्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलिसांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गवारे यांनी दिली.
मुरुड पोलीस ठाणे हे नावाबकालीन असल्याने त्या इमारतींना 100 वर्षे होऊन गेलीत. तर, मुरुड जेलचे 150 वर्षांपूर्वीचे दगडी बांधकाम आहे. जेलची गेली अनेक वर्षे दुरुस्ती झालेली नाही. पोलीस ठाण्याची मुख्य इमारतदेखील फार जुनी आहे. पोलीस कर्मचार्यांना राहण्याकरिता 27 खोल्या असून, त्या खोल्यांची अवस्था धोकादायक आहे. त्यामुळे पोलीस आपल्या परिवारासह आपला जीव मुठीत घेऊन राहात आहेत. बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. देखभालीअभावी वसाहत धोकादायक बनल्या आहेत. या इमारतींची सर्व दुरुस्ती कामे पावसाळा येण्यापूर्वीच व्हावी, अशी मागणी पोलिसांकडून होत आहे.
जानेवारी 2022 ला सर्व इमारतींच्या दुरुस्तीकामाचे अंदाजपत्रक बनून शासनाकडे पाठवण्यात आले आहे. अंदाजे 30 लाखांचे काम आहे. परंतु, निधीअभावे काम रखडले आहे. यावर्षी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून शासनाच निधी वर्ग केल्यास पावसाळ्याआधी दुरुस्तीचे काम करण्याचा प्रयत्न करू.
– अक्षय माने, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
- गवारे, पोलीस निरीक्षक, मुरुड
इमारती खूप जुन्या असल्याने आमच्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दुरुस्तीचे प्रस्ताव अनेक वेळा गेले आहेत. दुरुस्ती व नूतन इमारतीचे कामाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असल्याने ते लवकरात लवकर काम होण्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. माझ्या पोलिसांना राहण्याची चांगली सुविधा नसल्याने गावात खासगी घर भाड्याने घेऊन राहावे लागते.